भाजी मार्केट पूर्णत्‍वास; मात्र ताबा रखडला

भाजी मार्केट पूर्णत्‍वास; मात्र ताबा रखडला

Published on

प्रभागांचे अंतरंग ः कणकवली प्रभाग - १२


swt256.jpg
06565
कणकवली : शहरातील तेलीआळी डीपी रोड लगत भाजी मार्केटची इमारत पूर्ण झाली आहे.
swt257.jpg
06566
कणकवली : शहरातील बिजलीनगर भागात ७५ लाख रुपये खर्च करून श्रीधर नाईक उद्यानाची निर्मिती झाली; मात्र देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.
swt258.jpg
06567
कणकवली : येथील श्रीधर नाईक उद्यानामध्ये गेल्‍या दोन वर्षांत स्वच्छतागृहाची उभारणी झालेली नाही. पाण्याचीही इथे सुविधा करण्यात आलेली नाही.
swt259.jpg
06568
कणकवली : येथील मराठा मंडळ बंधाऱ्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला तर शहराची पाणी टंचाईतून सुटका होऊ शकते.

भाजी मार्केट पूर्णत्‍वास; मात्र ताबा रखडला
कणकवली प्रभाग १२, १३ ः श्रीधर नाईक उद्यानात स्वच्छतागृहाची वानवा
राजेश सरकारे ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ ः शहरातील हर्णेआळी आणि तेलीआळी भागाचा समावेश प्रभाग १२ मध्ये तर नेहरूनगर, बिजलीनगरचा समावेश प्रभाग १३ मध्ये झाला आहे. तेलीआळी डीपी रोडलगत तीन मजली भाजी मार्केटची इमारत विकासकाने बांधून पूर्ण केली आहे. सध्या या ठिकाणी सहा मीटरचा रस्ता आहे; मात्र या इमारतीकडे जाण्यासाठी नऊ मीटरचा रस्ता ही अट पूर्ण होत नसल्‍याने ही इमारत नगरपंचायतीच्या ताब्‍यात आलेली नाही. बिजलीनगर भागात तब्‍बल ७५ लाख रुपये खर्च करून उद्यानाची निर्मिती झाली; परंतु गेल्‍या दोन वर्षांत या उद्यानामध्ये स्वच्छतागृह, पाणी व्यवस्था उभी राहिलेली नाही. बिजलीनगर भागात औद्योगिक महामंडळाची मिनी इंडस्ट्री होती. ही जागा आता ओस पडली आहे.
हर्णेआळी, तेलीआळी हा कणकवली बाजारपेठ आणि राष्‍ट्रीय महामार्ग यामधील भाग आहे. नवनवीन बहुमजली इमारतींची उभारणी इथे होत आहे. विविध संस्था, आस्थापना, पतसंस्था, रुग्‍णालये आणि इतर कार्यालये या ठिकाणी उभी राहत आहेत. यातून रोजगाराची मोठी संधी शहरातील तरुणाईला मिळाली आहे. सर्व चीजवस्तू एकाच परिसरात उपलब्‍ध होत असल्‍याने पुढील काळातही तेलीआळी, हर्णेआळी भागाला प्रचंड महत्त्‍व प्राप्त होणार आहे. त्‍याअनुषंगाने रस्ते देखील प्रशस्त होण्याची गरज निर्माण झाली आहे. नव्याने पथदीप आणि सक्षम सांडपाणी व्यवस्था या प्रभागात निर्माण होईल, अशीही अपेक्षा शहरवासीयांना आहे. याच प्रभागात पार्किंगचे आरक्षण आहे. हे आरक्षण देखील विकसित होईल, याची प्रतीक्षा शहरवासीयांना आहे.
तेलीआळी डीपी रोडमध्ये भाजी मार्केटसाठी आरक्षित जागा होती. खासगी जमीन मालकांनी एकत्र येऊन यातील ४० टक्‍के जागा नगरपंचायतीकडे वर्ग करणे, त्‍यामध्ये तीन मजली भाजी मार्केटची इमारत बांधणे आणि उर्वरित जागेत व्यावसायिक, निवासी इमारतींची उभारणी करणे, असा करार केला. त्‍यानुसार दोन वर्षांपूर्वीच तीन मजली भाजी मार्केटची इमारत तयार झाली; मात्र या इमारतीकडे जाण्यासाठी करारानुसार नऊ मीटरचा रस्ता झाला नाही. त्‍यामुळे ही इमारत नगरपंचायतीने ताब्‍यात घेतलेली नाही. वस्तुत: नगरपंचायत प्रशासन आणि नगरविकास विभाग या प्रश्‍नावर तोडगा काढू शकते, पण राजकीय बाबींमुळे अद्यापही हे भाजी मार्केट नगरपंचायतीच्या ताब्‍यात आलेले नाही. जर भाजी मार्केटची इमारत ताब्‍यात आली, तर महामार्ग दुतर्फा असलेले सर्व फळ, फुल आणि भाजी विक्रेत्‍यांचे या इमारतीमध्ये स्थलांतर होऊन महामार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे.
कणकवली शहरात १९७५ ते १९९० पर्यंत बिजलीनगर भागात मिनी एमआयडीसी होती. या औद्योगिक वसाहतीमध्ये स्पेअरपार्ट, पावडर व अन्य उत्पादनांची निर्मिती होत असे. नंतर ही औद्योगिक वसाहत बंद झाली. महामार्गापासून अगदी जवळ असलेल्‍या या जागेत पुन्हा औद्योगिक वसाहत निर्माण होऊ शकते, पण यासाठी आजवर प्रयत्‍न झालेले नाहीत. याचबरोबर शहरातील मुडेश्‍वर मैदान परिसरात कित्येक एकर जागा पड आहे. या भागातही औद्योगिक वसाहत उभी राहिली तर कणकवलीच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते. त्‍यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्‍न होणे आवश्‍यक आहे.
शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत महावितरण आणि पारेषण कंपनीची कार्यालये, गोडाऊन आणि सबस्टेशन आहेत. यामुळेच येथील भागाचे नाव ''बिजलीनगर'' असे करण्यात आले, परंतु खुद्द बिजलीनगर भागाला ग्रामीण फिडरवरून वीजपुरवठा होत असल्‍याने वारंवार वीज खंडित होण्याची समस्या उद्‌भवते. तसेच या भागात येणारे रस्ते देखील अरुंद आहेत. पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेली निवासस्थाने मोडकळीस आल्‍याने हा भाग बकाल दिसत आहे. हर्णेआळी, तेलीआळी, विद्यानगर आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्या मधला भाग रस्ता नसल्याने अविकसित राहिला आहे. या सखल भागात सांडपाणी देखील साचून राहत आहे.
बिजलीनगर, नेहरूनगर भागाला गडनदीची किनार आहे. येथे ब्रिजकम बंधारा झाल्याने मे अखेरपर्यंत मुबलक पाणीसाठा होत आहे. या बंधाऱ्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला तर मे अखेरपर्यंत शहराला मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो; मात्र पाटबंधारे विभागाकडून या बंधाऱ्यात पाणी अडवले जाते. या बंधाऱ्याला दरवर्षी गळती लागते आणि मार्च अखेरपर्यंत सर्व पाणी वाहून जाते. त्‍यामुळे शहरवासीयांना दरवर्षी मेमध्ये पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. या बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होईल, यासाठी नगरपंचायत प्रशासन आणि भावी पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे.
-----------------------
अशी आहे प्रभाग रचना
प्रभाग - १२
* लोकसंख्या ९७२
* मतदार - ६५८
* आरक्षण- सर्वसाधारण महिला
* प्रभागातील समाविष्ट भाग : हर्णेआळी, तेलीआळी व उर्वरित भाग.
----------------------
अशी आहे प्रभाग रचना
प्रभाग - १३
* लोकसंख्या - ८४०
* मतदार - ७८०
* आरक्षण - ओबीसी
* प्रभागातील समाविष्ट भाग : नेहरूनगर, बिजलीनगर.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com