...आता मतदानाची प्रक्रिया झाली अधिक सोपी

...आता मतदानाची प्रक्रिया झाली अधिक सोपी

Published on

तीन मतांसाठी दोन इलेक्ट्रॉनिक यंत्रे
जीवन देसाई ः मतदानाची प्रक्रिया झाली सोपी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीमध्ये एका मतदाराला तीन मते द्यावी लागणार आहेत. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे मतदान यंत्र वेगळे आणि नगरसेवक उमेदवारांचे मतदान यंत्र वेगळे असणार आहे. निवडणूक विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे मतदान प्रक्रिया अतिशय सुटसुटीत होणार आहे. त्यामुळे २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले आहे.
रत्नागिरी पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १६ प्रभागातील ३२ नगरसेवकांच्या जागांसाठी १०१ उमेदवार रिंगणात आहेत. एका मतदाराला एक नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवकपदाच्या उमेदवारांना तीन मते करायची आहेत. यामध्ये सर्वसामान्य मतदार गोंधळून जाण्याची शक्यता आहे. एकच मतदान यंत्र असेल तर अपेक्षित उमेदवारांना शोधताना मतदाराचा गोंधळ उडणार हे निश्चित आहे. मतदारांची ही अडचण लक्षात घेऊन निवडणूक विभागाने ही प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व मतदान केंद्रांवर आता एक नव्हे तर दोन मतदान यंत्र असणार आहेत. एका मतदान यंत्रावर फक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहे. त्यापैकी आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करता येणार आहे. दुसरे मतदान यंत्र नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी असणार आहे. यामध्ये ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन नगरसेवकांना मतदान करायचे आहे. दोन मतदान यंत्र असल्याने उमेदवार शोधून अपेक्षित उमेदवाराला मतदान करता येणार आहे.
------
चौकट
मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभाग आणि पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट तयार केले आहेत. घंटागाड्यावरील ध्वनिक्षेपकावरून जनजागृती केली जात आहे. सकाळी मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या लोकांमध्ये मतदानाची जागृती सुरू आहे. अनेक ठिकाणी फलक, बॅनर लावण्यात आले आहेत. प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही अधिक बळकट करावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com