सरकारनामासाठी
सर्वाधिक अपक्षांमुळे अटीतटीची लढत
लांजा नगरपंचायत ; नगराध्यक्षपदासाठी तिरंगी
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २५ ः लांजा नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही मते प्रत्येक प्रभागात निर्णायक ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही निवडणूक सर्व राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली असल्यामुळे नगराध्यक्षासह नगरसेवकांमध्येही अटीतटीची लढत होणार आहे.
लांजा नगरपंचायतीत लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवक पदासाठी २ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. महायुतीकडून १६ जागा महाविकास आघाडीकडून १४ जागांवर उमेदवार रिंगणात आहेत तसेच २५ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नियमित राजकीय पक्षांबरोबर अपक्षांची सख्या मोठी आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून सावली सुनील कुरूप, महाविकास आघाडीकडून पूर्वा मंगेश मुळे आणि अपक्ष प्रियांका संजय यादव निवडणूक लढवत आहेत. तीनही तुल्यबळ उमेदवार असून, नवे चेहरे आहेत. शिवसेना पक्षाच्या सावली सुनील कुरूप या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द नसली तरी त्यांचे पती सुनील नारायण कुरूप हे माजी नगराध्यक्ष, माजी सभापती, सरपंच अशी पदे भूषवली आहे. युतीचे आमदार किरण सामंत यांची ताकद आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पूर्वा मंगेश मुळे या निवडणूक लढवत आहेत. मुळे यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. उपनगराध्यक्ष गटनेता अशी विविध पदे भूषवली आहेत. दोनवेळा निवडणूक लढवून दोन्ही वेळा चांगले मताधिक्य घेऊन त्या विजयी झाल्या आहेत. लांजा शहरातील प्रारूप विकास आराखडा, घनकचरा प्रकल्प हे विषय प्रामुख्याने प्रचारात घेऊन ते रद्द करण्याचा वचननामा जाहीर केला आहे तसेच पायाभूत सुविधांसह इतर विविध विकासाचे मुद्दे केंद्रित केले आहेत. तसेच भाजप पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष कट्टर राणे समर्थक संजय यादव यांना उमेदवारी डावलण्यात आल्याने संजय यादव यांनी बंडाचे निशाण घेऊन पत्नी प्रियांका संजय यादव यांना अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. प्रियांका यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होईल, असा तर्क लावला जात आहे.
चौकट
प्रमुख पक्षांची सत्त्वपरीक्षा
लांजा नगरपंचायतीत महायुती, महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. उमेदवार ‘डोअर टू डोअर’ प्रचार करताना दिसत आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने नाराजीपोटी काही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. भाजप पक्षाने बंडाचे निशाण घेऊन नऊ अपक्ष उमेदवार उभे केल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रमुख पक्षांची सत्त्वपरीक्षा पाहणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

