बंडखोरांनी वेळीच माघार घ्या, अन्यथा कारवाई
पक्षविरोधी कृती सहन करणार नाही
किरण सामंत ः बंडखोरांना थेट इशारा, लांजा शहर, सुंदर शहर संकल्पना
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २५ ः लांजा-कुवे नगरपंचायत निवडणुकीतील बंडखोर उमेदवारांनी वेळीच माघार घेऊन महायुतीच्या उमेदवारांचे काम केले नाही तर त्यांच्यावर पक्षाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल. पक्षाच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्यांना सोडणार नाही. मग तो कोणीही असो, कारवाई होणारच, असे आमदार किरण सामंत यांनी ठणकावून सांगितले. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप महायुती वर्चस्व राखणार असून, महायुतीच्या माध्यमातून लांजा शहर, सुंदर शहर ही संकल्पना राबवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
ते लांजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. लांजा शहरातील शिवसेनेच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येथे आले होते. ते म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत आपल्याला लांजा शहरातून सुमारे दोन हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. आता तर माजी आमदार राजन साळवी आणि अविनाश लाड हे आमच्या पक्षात आले आहेत. त्यामुळे लांजा शहरात शिवसेनेची ताकद वाढली असून, मताधिक्यही वाढेल. रस्ते, गटारे, पाखड्या, पाणी यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न असतात. त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून लांजा शहर, सुंदर शहर ही संकल्पना आम्ही राबवत आहोत. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा, वृद्ध नागरिकांसाठी नमो उद्यान, कला रसिकांसाठी एक सुसज्ज असे कलादालन, शहरातील सर्व ऐतिहासिक तळ्यांचे सुशोभीकरण, सर्व शासकीय इमारतींचे नूतनीकरण तसेच नगरपंचायतीला अग्निशमन बंब पुरवणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लांजा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पाणीपुरवठा योजना राबवण्याचा आमचा मानस आहे. सौरऊर्जेचा वापर करून ही योजना राबवली तर लाईटबिल कमी येऊन त्याचा फायदा नागरिकांना कमी पाणीपट्टीच्या माध्यमातून होईल. याशिवाय बेरोजगारीचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उद्योग, व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
चौकट १
हरकतीनुसार ‘डीपी प्लॅन’मध्ये सुधारणा
लांजा शहरविकास आराखड्याविषयी (डीपी प्लॅन) बोलताना आमदार सामंत म्हणाले, डीपी प्लॅनमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या केल्या आहेत. नऊ मीटरच्या रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली असून, संपूर्ण शहरातील एनडीझेड (नो डेव्हलपमेंट झोन) उठवण्यात आला आहे. डीपी प्लॅनबाबत ज्या काही हरकती आल्या होत्या त्यांचा पूर्णपणे विचार करूनच त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या डीपी प्लॅनमध्ये काहीच त्रुटी राहिलेल्या नाहीत. विरोधक या विषयाचे केवळ राजकारण करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

