घोडेमुख जत्रोत्सवाला गर्दीचा उच्चांक
swt2522.jpg
06655
पेंडूर ः श्री देव घोडेमुख येथील जत्रोत्सव भाविकांची गर्दी उसळली होती.
swt2523.jpg
06656
पेंडूरः येथे भाविकांनी कोंब्यांचा मान दिला.
swt2524.jpg
06657
पेंडूरः उंच डोंगरावर श्री देव घोडेमुख मंदिराकडे भाविक पायी चालत जातात. (छायाचित्रे ः रुपेश हिराप)
घोडेमुख जत्रोत्सवाला गर्दीचा उच्चांक
‘कोंब्या’चा नवसः राज्यासह गोवा, कर्नाटकातून उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान असलेले वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-पेंडूर येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज भक्तिमय वातावरणात झाला. या जत्रोत्सवाला सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी करत देवाचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांकडून देव घोडेमुखाला हजारो कोंब्यांचा मान देण्यात आला.
भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वर, ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्री घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. सावंतवाडी-शिरोडा मार्गावर सावंतवाडीपासून सुमारे १५ किलोमीटरवर रस्त्याला लागून असलेल्या निसर्गरम्य डोंगराच्या एका टोकावर हे देवस्थान वसलेले आहे. जत्रोत्सवानिमित्त आज सकाळपासूनच श्री देव घोडेमुखाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. मंदिर डोंगरावर असल्याने वयोवृद्ध भाविकांना डोंगर चढणे अवघड असल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी केळी-नारळ ठेवण्याची व्यवस्था देवस्थानकडून केली होती.
मोठ्या संख्येने भाविकांनी तब्बल ७०० ते ८०० मीटर डोंगर चढून श्री देव घोडेमुखाचे दर्शन घेतले. या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित मुंबई, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर व इतर भागांतील भाविक दाखल झाले होते. ‘कोंब्याची जत्रा’ म्हणून हा जत्रोत्सव प्रसिद्ध असल्याने तसेच श्री देव घोडेमुखाला कोंबड्याचा मान देण्यात येत असल्याने जत्रोत्सवाच्या परिसरात कोंबडे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. अनेकांकडून ते खरेदी करण्यासाठी मोठी लगबग दिसून येत होती.
दुपारनंतर भाविकांची गर्दी अधिकच वाढत गेली. हा जत्रोत्सव मुख्य रस्त्यावर पार पडतो. त्यामुळे मुंबई-शिरोडा महामार्गावर तब्बल तीन ते चार तास वाहतूक कोंडी झाली होती. वेंगुर्ले पोलिस ठाण्याने आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे काही अंशी वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिस कर्मचाऱ्यांना यश मिळत होते. सातत्याने रस्त्यावरून वाहने जा-ये करत असल्याने वाहतूक कोंडी वारंवार निर्माण होत होती.
सायंकाळी साडेचार वाजता मातोंड सातेरी मंदिर येथून तरंग देवतांचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या जत्रोत्सवाला सुरुवात झाली. देवस्वाऱ्या डोंगर चढून घोडेमुख मंदिरात पोहोचल्यानंतर धार्मिक विधींना सुरुवात झाली. घोडेमुखच्या चाळ्यांना गावकरी व मानकरी यांनी कोंब्याचा मान दिल्यानंतर भाविकांच्या आणलेल्या हजारो कोंब्यांचा मान देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांची मोठी झुंबड पाहायला मिळाली. हा विधी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी उशिरा देवस्वाऱ्या व अवसारी पुन्हा सातेरी मंदिराकडे निघाली आणि या जत्रोत्सवाची सांगता झाली. दरवर्षीपेक्षा यावर्षी या जत्रोत्सवाला भाविकांनी अफाट गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

