एकाच पक्षाचे कार्यकर्ते परस्परविरोधी उभे ठाकणार

एकाच पक्षाचे कार्यकर्ते परस्परविरोधी उभे ठाकणार

Published on

एकाच पक्षाचे कार्यकर्ते परस्परविरोधी उभे ठाकणार
चिपळूणमधील स्थिती; महाविकास आघाडीत गोंधळाची स्थिती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ : येथील पालिकेच्या निवडणुकीत नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली असून, गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असून, कुणाच्या बाजूने उभे राहायचे, असा प्रश्न पडला आहे. नेत्यांच्या गोंधळामुळे एकाच पक्षाचे कार्यकर्ते परस्परविरोधी उभे ठाकलेले यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
चिपळूण पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात असून, २८ नगरसेवकपदांसाठी ११० उमेदवार रिंगणात आहेत. या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे शिवसेना तर राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार अशी चार छकले झाली आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, भाजप, समाजवादी असे पक्ष रिंगणात आहेत. चिपळूणमध्ये तर आघाडी किंवा महायुती झालेली नाही. आमदार भास्कर जाधव यांचा स्वतंत्र गट रिंगणात असून, त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाशी हातमिळवणी केली आहे.
ठाकरे शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. नगराध्यक्षपदासाठी राजू देवळेकर यांना रिंगणात उतरवले आहे तर आमदार जाधव व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून रमेश कदम रिंगणात आहेत. काँग्रेस स्वबळावर असून, सुधीर शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तर भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली असून, युतीचे उमेदवार म्हणून उमेश सकपाळ शर्यतीत आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार मागे घेतला असला तरी नगरसेवकपदासाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. दोन अपक्ष व समाजवादी पक्षाचा उमेदवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. विधानसभा व लोकसभेसाठी आघाडी किंवा महायुती करणारे पक्ष आता गल्लीतल्या निवडणुकीत मात्र मानपान व जुने वाद रंगवत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची फरफट होणार आहे आणि पाडापाडीचे राजकारण रंगणार आहे.
चिपळूणमध्ये १४ प्रभागांसाठी २८ नगरसेवक निवडून जाणार आहेत. या प्रत्येक प्रभागात रिंगणात असलेल्या उमेदवारांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडणार आहे. प्रचाराला कमी दिवस असतानाच नेत्यांमधील वाद, मानपान उफाळून आले आहे. चिपळूणच्या राजकारणात सक्रिय असणारे विद्यमान आमदार शेखर निकम हे महायुतीतून बाहेर आहेत तर शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण आणि भाजप नेते प्रशांत यादव यांची युती झाली आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते भास्कर जाधव व रमेश कदम यांची आघाडी तर ठाकरे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात दिले आहेत. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी काँग्रेसचे पॅनल रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे नेते विभागले गेले असून, यात कार्यकर्त्यांची ‘गोची’ झाली आहे. प्रत्येक प्रभागात ही समस्या निर्माण झाली असून, कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागात अनेक उमेदवार रिंगणात आहेत.

कोट
सध्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांकडूनच दुजाभाव केला जात असल्याचे चित्र आहे. या वेळच्या निवडणुकीत तसेच दिसत आहे. त्यामुळे कोणाचा झेंडा हाती घ्यायचा आहे, हे कार्यकर्त्यांनी ठरवले पाहिजे.
- अशोक भुस्कुटे, नागरिक चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com