देवगडचे रस्ते हरवले खड्ड्यांत
07192
देवगड : येथील शहरातील रस्त्यांची अशी दुर्दशा झाली आहे. (छायाचित्र : संतोष कुळकर्णी)
देवगडचे रस्ते हरवले खड्ड्यांत
स्थानिकांची डोकेदुखी; मुलभूत प्रश्न न सुटल्याने अपेक्षाभंग
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ ः पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या देवगड-जामसंडे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दैना उडाली आहे. बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांसाठी खड्ड्यात हरवलेले हे रस्ते खूप मोठी डोकेदुखी बनली आहे. येथे नगरपंचायत स्थापन होऊन ९ वर्षे उलटली तरी मुलभूत प्रश्नही मार्गी न लागल्याने स्थानिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. कारण, केवळ रस्तेच नाही तर पाणी, पथदीप याच्याशी संबंधित अडचणीही कायम आहेत.
देवगड आणि जामसंडे या दोन स्वतंत्र ग्रामपंचायतीची मिळून मार्च २०१६ मध्ये नगरपंचायत स्थापन झाली. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने स्थानिक नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. शहराचा झपाट्याने विकास होईल अशी सर्वसामान्यांना आशा होती. मात्र, शहराचे मुलभूत प्रश्न तडीस लागताना काही दिसत नाहीत. रस्ता, वीज आणि पाणी या नागरिकांच्या मुलभूत गरजा आहेत. मात्र, याच समस्यांना बगल दिली जात आहे. शहरातील काही अंतर्गत रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. याच रस्त्यावरून नागरिकांना वाहने हाकत मार्ग काढावा लागत असल्याचे दिसून येत आहे. काही भागातील रस्त्यांची मोठी चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येथील बीएसएनएल कार्यालयासमोरील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून नागरिकांना चालणेही अवघड बनले आहे. या भागात बरीच वस्ती आहे. निवासी संकुले, घरे आहेत. शिवाय शहरातील पर्यायी मार्ग म्हणूनही याचा उपयोग होतो. याच भागात शासकीय रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याचे मुख्य प्रवेशद्वार याच दिशेने आहे. त्यामुळे इमारत पूर्णत्वास गेल्यावर याच मार्गावरून वर्दळ वाढणार आहे. अशावेळी या नादुरुस्त रस्त्याची अडचण निर्माण होऊ शकते. याच भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. प्लास्टिक, कचरा, टाकावू साहित्याचा पसारा आहे. त्यामुळे दुर्गंधी वाढून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्वच्छ, सुंदर शहर ही संकल्पना केवळ कागदावरच आहे की काय? प्राथमिक विकासाच्या समस्यांची कधी सोडवणूक होणार? असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.
........................
सक्षमीकरण आवश्यक
शहराच्या मुलभूत गरजांपैकी एक असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सद्यस्थितीतील दहिबांव अन्नपूर्णा नदीवरील देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने शहराचा पाणीपुरवठा अधूनमधून ठप्प होतो. दोन दिवसांनी केवळ एक तास तेही अपुऱ्या दाबाने शहरातील ग्राहकांना पाणी पुरवठा केला जातो. आता पावसाळा संपल्याने नागरिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. नळयोजनेच्या पाण्यावर अनेक कुटुंबे अवलंबून असल्याने नळयोजना सक्षमीकरण होईपर्यंत समस्या भेडसावत राहण्याची शक्यता आहे.
..............................
गटारींचा प्रश्न
शहरातील सांडपाण्याच्या उघड्या गटारींचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरुन डासांची पैदास वाढली आहे. पर्यायाने यामुळे रोगराईला आमंत्रण मिळण्याची शक्यता अधिक आहे. काही अंतर्गत रस्त्यालगत आवश्यकता नसताना गटारी खोदाई केली आहे. काही गटारीच्या बांधकामांच्या एकूणच दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरासाठी आवश्यक काय? याचा प्राधान्यक्रम ठरवण्याचीही आवश्यकता यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
................................
बहुतांश पथदीप बंद
शहरासाठी पथदीप महत्त्वाचे आहेत. काही भाग वाड्यावस्त्यांचा असल्याने मार्गावर, पायवाटेवर पथदीप आवश्यक असतात. मात्र, शहराचा एकूणच विचार करता ही समस्याही गंभीर आहे. शहरातील काही भागातील पथदीप बंद आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना याची प्राधान्याने अडचण जाणवते. यामुळे स्थानिकांच्या तक्रारी वाढत आहेत.
.................................
07194
देवगड-जामसंडे नगरपंचायत होऊन सुमारे नऊ वर्षे उलटली तरी शहरात अद्यापही पायाभूत सुविधांची वानवा आहे. बीएसएनएल कार्यालयासमोरील रस्त्याची तर मोठी दुरवस्था झाली आहे. वाहनेच काय, साधे चालणेही अवघड बनले आहे. गर्भवती महिला, वयोवृद्धांना वैद्यकीय उपचारासाठी जाणे अवघड बनले आहे. या मार्गावरून रिक्षा नेण्याचे टाळले जात असल्याने नागरिकांना फिरुन जाण्याचा आर्थिक भुर्दंड बसतो. पथदीप नसल्याने रात्रीच्यावेळी भटकी कुत्री, मोकाट जनावरे दिसत नाहीत. शहरातील मध्यवर्ती ठिकाणची अशी अवस्था असेल आणि नगरपंचायत नागरिकांना सक्षम सुविधा पुरवू शकत नसेल तर नगरपंचायतीचा जनतेला काय उपयोग? असा प्रश्न आहे.
- संजय पराडकर, माजी सदस्य, पंचायत समिती, देवगड
---
कोट
07193
शहरातील अंतर्गत रस्ते, पथदीप यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झाला की कामे मार्गी लावली जातील. नवीन पथदीप लाईन ओढण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. काही ठिकाणी सौरऊर्जा पथदीप बसवण्यासाठीही नियोजन सुरू आहे. दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीवरील देवगड प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनीचे काम सुरू होईल. जलवाहिनी सक्षमीकरण झाल्यावर शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.
- साक्षी प्रभू, नगराध्यक्षा, देवगड जामसंडे नगरपंचायत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

