२५ कोटींचा आयपीडीएस वीजप्रकल्प कागदावरच
खेडचा ‘आयपीडीएस’ वीजप्रकल्प कागदावरच
निकषाप्रमाणे काम नाही ; ३० किमी भूमिगत केबल टाकल्याचा अहवाल
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २९ : शहरात आधुनिक व सुरक्षित वीजपुरवठ्याचे स्वप्न दाखवत २०१७ मध्ये भारत सरकारच्या ‘इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम’ (IPDS) अंतर्गत भूमिगत विद्युतीकरण प्रकल्पास सुरुवात झाली. आठ वर्षांपूर्वी २५ कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एका वर्षात पूर्ण करायचा होता. २०१९ मध्ये महावितरणकडून काम पूर्ण झाल्याचे अहवाल देण्यात आला; मात्र शहरातील प्रत्यक्ष स्थिती पाहता हा प्रकल्प केवळ कागदोपत्रीच पूर्ण असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
खेड शहराची वाढती व्याप्ती, उंच इमारतींची वाढ तसेच वारंवार उद्भवणारी पूरपरिस्थिती यामुळे भूमिगत वीजयंत्रणेची गरज अत्यंत महत्त्वाची आहे. पावसाळ्यात होणारा वीजपुरवठा खंडित होणारा त्रास कमी करण्यासाठी भूमिगत केबल्स हा विश्वसनीय पर्याय मानला जातो; परंतु खेडमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्याचा दावा किती खरा आहे, यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रकल्पानुसार साडेचार फूट खोल खड्डा करून एचटी व एलटी केबल बसवणे बंधनकारक होते; मात्र खेडमध्ये अनेक ठिकाणी केबल अगदी वरचेवर टाकून माती टाकल्याचे दिसून आले. काही भागात तर खोदकामाचे चिन्हही नाही. स्थानिकांच्या मते, अनेक रस्त्यांवर भूमिगत केबल टाकलेलीच नाही. यामुळे महावितरणच्या ‘पूर्णत्वाचा’ दावा संशयास्पद ठरतो.
-----
चौकट १
‘फिडर पिलर बॉक्स’ची बिकट अवस्था
शहराच्या प्रमुख रस्त्यांपासून ते रहिवासी भागात सर्वत्र बसवलेले फिडर पिलर बॉक्स सध्या बंद अवस्थेत दिसतात. अनेक बॉक्स पूर्णपणे गंजलेले असून, काही ठिकाणी ते उघडे पडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही बॉक्स तर अर्धवट स्थितीत, ठिकठिकाणी तुटक्या अवस्थेत पडलेले दिसतात.
----
चौकट २
प्रत्यक्षात काम किती
आयपीडीएस अंतर्गत खेडमध्ये तब्बल ३० किलोमीटर भूमिगत केबल जाळे उभे करणे अपेक्षित होते. कोट्यवधी रुपयांचा निधी वापरल्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी आजही विद्युततारा उघड्यावरच लोंबत आहेत. ज्या भागात केबल्स टाकल्याचा दावा केला गेला, त्या भागातही प्रणाली कार्यान्वित नाही.
-----
कोट १
या संपूर्ण प्रकरणाबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याने माहिती देऊ शकत नाही, असा प्रतिसाद मिळाला. आठ वर्षांपासून प्रकल्प रखडल्याचा आणि नियमबाह्य काम झाल्याचा आरोप होत असतानाही अधिकृत माहिती लपवली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
- अॅड. सैफ चौगुले, खेड
-----
कोट २
खेड शहराचा विकास, सुरक्षित वीजपुरवठा आणि पावसाळ्यातील आपत्तीपासून संरक्षण हे सर्व काही या प्रकल्पाशी जोडलेले असताना आठ वर्षांनंतरही तो फक्त कागदोपत्रीच मर्यादित राहिल्याने याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष द्यावे.
--संजय विचारे, सामाजिक कार्यकर्ते
--------
कोट ३
प्रकल्पासंदर्भात आम्ही पालिकेकडून महावितरणला लागणारी सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती महावितरणकडूनच मिळेल.
--महादेव रोडगे, मुख्याधिकारी, खेड नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

