हिंदी सक्ती विरोधात रस्त्यावर या

हिंदी सक्ती विरोधात रस्त्यावर या

Published on

07722

हिंदी सक्ती विरोधात रस्त्यावर या

दीपक पवार ः मुंबईत पाचवे समाज साहित्‍य भाषा विचार संमेलन

कणकवली, ता. १ ः मराठी भाषेसाठी, मराठी समाजासाठी थोडेफार काही बरं करायचं असेल तर ते एकट्या दुकट्या माणसाला आता शक्य नाही. यासाठी सर्वांनी संघटित होऊनच काम करावे. शासनाने तिसऱ्या भाषेचा पर्याय निवडण्यासाठी समिती नेमली तरी या समितीचा अहवालही शासन धार्जिनाच असणार असून हिंदीची सक्ती केली जाणार आहे. त्यामुळे संघटितपणे सगळ्यांनी रस्त्यावर येऊन या हिंदी सक्तीच्या विरोधात लढा उभारूया, असे आवाहन पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनात संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. दीपक पवार यांनी केले.

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान आणि सहयोग संस्था वसई यांच्या संयुक्त विद्यमाने वसई भुईगाव येथे डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवशीय समाज साहित्य भाषा विचार संमेलन झाले. यावेळी डॉ. पवार यांनी मराठी भाषेविरोधात राजकारण करणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेच्या विरोधात आसूड ओढले. यावेळी संमेलनाचे उद्‍घाटक विकास वर्तक, समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक कवी अजय कांडर, अध्यक्ष मधुकर मातोंडकर, सहयोग संस्थेचे संचालक कवी सायमन मार्टिन, ज्येष्ठ लेखिका संध्या नरे पवार तसेच समाज साहित्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी सुरेश बिले, प्रा.संजीवनी पाटील, सफरअली इसफ, डॉ.योगिता राजकर, मनीषा शिरटावले, प्रज्ञा मातोंडकर, विजय सावंत, भालचंद्र सुपेकर, हरिचंद्र भिसे, रमेश सावंत, सत्यवान साटम आदी उपस्थित होते. या प्रसंगी विख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन पुरस्कार तर नाटककार उदय जाधव यांना जयंत पवार पुरस्कार आणि कवी अक्षय शिंपी यांना प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार डॉ. दीपक पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
डॉ. पवार म्हणाले, ‘आजच्या काळात शून्य भूमिका घेणारे लोक आजूबाजूला आहेत. काही अपवाद वगळता प्राध्यापक, लेखक, कवी यांच्याकडून काहीच अपेक्षा बाळगू नये असा हा काळ आहे. अशा काळात साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक संघटनेचे काम करणे फार कठीण आहे. त्याचा त्रास काय असतो हे मी अनुभवत आहे. अशावेळी अजय कांडर आणि सायमन मार्टिन यांच्यासारखे कवी लोकांसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करतात, हा भाषेचाच गौरव आहे. कार्यक्रमांना लोक उपकार केल्यासारख्या येतात. असा श्रोताहीन हा काळ आपण पाहतो आहोत. हा आपल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातला मोठा आजार आहे. तिसरी पर्यायी हिंदी भाषा लादण्यासाठी जी समिती नेमली आहे. त्या समितीने कितीही लोकांचा कौल घेतला तरी शासनाला जे पाहिजे तेच ही समिती देणार असल्यामुळे यापुढे लोकांनी संघटित होऊन हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात रस्त्यावर उतरावे.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली समाज आणि साहित्य हा परिसंवाद झाला. यावेळी श्री कांदळकर यांनी समाजापासून साहित्यिकांचं नातं तुटल्यामुळे त्याचा साहित्यावरही परिणाम झालेला दिसतो असे निरीक्षण नोंदविले. तर सहभागी वक्ते कादंबरीकार सुशील धसकटे म्हणाले,साहित्य आणि समाज यांच्यामध्ये लेखक उभा असतो, त्यामुळे स्वाभाविकच लेखकावर अधिक जबाबदारी येऊन पडते. लेखक आपल्या आजूबाजूच्या वास्तवाला कशाप्रकारे सामोरा जातो, वास्तवातील सत्याचं तो कशाप्रकारे चित्रण करतो, सत्याचे अन्वयार्थ तो कशाप्रकारे उलगडून दाखवतो, हेच अंतिमतः महत्त्वाचे असते. या दृष्टीने लेखकाने सतत स्वतःला पारखून घेतलं पाहिजे.
प्रा.संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शिल्पा परुळेकर यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. दरम्यान, कांडर यांनी पुढील संमेलन पुणे येथे घेण्यात येईल, असे घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com