कुडाळवासीय रमले हास्यकल्लोळात
swt12.jpg
07752
कुडाळः ‘सीरियल किलर’ या सिने नाट्य अभिनेते भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या नाटकाचा प्रयोग येथील रंगभूमीवर पार पडला.(छायाचित्रः अजय सावंत)
कुडाळवासीय रमले हास्यकल्लोळात
‘सीरियल किलर’ला प्रतिसादः स्वामी समर्थ मठाच्या मदतीसाठी नाट्यप्रयोग
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः ‘सीरियल किलर’ या नाटकातून अभिनयाचा बादशाह असणाऱ्या भाऊ कदमने समाजाच्या प्रवाहात वाटचाल करताना सातत्याने बघण्यात असलेल्या मालिकेतून त्याचे उमटत असणारे परिणाम विनोदी शैलीतून दाखवून कुडाळच्या रसिकांना हास्यकल्लोळाच्या दुनियेत नेले. येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी मदत निधी म्हणून हा नाट्यप्रयोग रविवारी (ता. ३०) रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये पार पडला.
अल्पावधीतच नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘सीरियल किलर’ या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्राबरोबरच गोवा, कर्नाटक राज्यांतही रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावर सुरू आहेत. बेळगावमध्ये या नाट्यप्रयोगानंतर कुडाळमध्ये हा नाट्यप्रयोग येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाच्या मदतीसाठी सादर करण्यात आला. स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई यांच्या सौजन्याने या नाट्यप्रयोगाचा इतर नाट्य रसिकांसह कातकरी समाजातील मुलांनी लाभ घेतला. एका मालिकेतील अभिनेत्री आणि एका रिपोर्टरमध्ये घडलेल्या घटनेने संशयाचे वातावरण तयार होते. मग ‘सीरियल किलर’ म्हणून आलेला माणूस खरेच ‘किलर’ असतो की नाही, अशा धमाल सादरीकरणाने रसिकांची चांगलीच करमणूक झाली. प्रेक्षकांचे मनोरंजन कसे होईल, याची खबरदारी घेण्यात आली. नाटकात भाऊ कदम यांनी बावळट रिपोर्टर कम वैतागलेल्या नवऱ्याची भूमिका लक्षवेधी केली. ‘सीमा’ या पात्रातून मालिकांच्या आहारी गेलेली स्त्री कुठल्या टोकाला जाऊ शकते, हे उत्तमरित्या सादर केले. भाऊ कदम व सीमा यांचे विनोदी संवाद भन्नाट होते. प्रद्युम्नच्या भूमिकेत तेजस पिंगुळकर होते.
प्रदीप मुळे यांच्या नेपथ्यातून राधिकाचे आधुनिक घर आणि रिपोर्टरची गरिबीतील खोली उत्तम उभी केली. श्याम चव्हाण यांनी प्रकाशयोजनेतून ताणतणावाचे प्रसंग नेमकेपणाने दाखवले. विजय गवंडे यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी पार पाडली. सर्व कलाकारांनी उपस्थित नाट्यरसिकांचे आभार मानले. यावेळी सिने नाट्य अभिनेता भाऊ कदम, गौरी किरण, गायत्री दातार, तेजस पिंगुळकर, दिग्दर्शक केदार देसाई, निर्माते प्रणय तेली, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, साहिल देसाई, सई तेली आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

