बीएसएनएल सेवा न्हावेलीत विस्कळीत
‘बीएसएनएल’ सेवा
न्हावेलीत विस्कळीत
सावंतवाडी ः न्हावेली गावात काही दिवसांपासून ‘बीएसएनएल’ची सेवा विस्कळीत झाली असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावात टॉवर असूनही नेटवर्क कधीही येते, कधीही जाते. या अनिश्चिततेमुळे नोकरदारवर्ग आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. ही सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. इंटरनेट आणि मोबाईल सेवा ही मूलभूत गरज बनली आहे. अनेक नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ करावे लागते. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, गृहपाठांसाठी इंटरनेटची आवश्यकता असते. न्हावेलीत ‘बीएसएनएल’च्या अनियमित सेवेमुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. महत्त्वाचे फोन कॉल्स लागत नाहीत. इंटरनेट संथ चालते किंवा पूर्णपणे बंद होते. त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबत आहेत. तातडीने सेवा सुरळीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा न्हावेली ग्रामस्थांनी दिला आहे.
-----
दाणोलीत रविवारी
वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे ः दाणोली ग्रामदैवत श्री लिंग माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी (ता. ७) होणार आहे. दाणोलीसह देवसू व केसरी या तीन गावांचे देवस्थान असल्यामुळे या उत्सवात हजारो भाविक लिंगमाऊली चरणी नतमस्तक होतात. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी महती असलेल्या आणि माहेरवाशिणीची पाठीराखी असलेल्या लिंगमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. यानिमित्त सकाळी मंदिरात पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर लिंगमाऊलीला भरजरी वस्त्रांसह सुवर्णालंकार आणि आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर तीन गावच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरण्यात येणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.
--
बांद्यात ८ पासून
‘वार्षिक देवकार्य’
बांदा ः वाळके कुटुंबीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव वाळकेश्वर मंदिरात यंदाचे वार्षिक देवकार्य (पराब) ८ व ९ डिसेंबरला होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित वाळके यांनी ही माहिती दिली. या दोन दिवसांत विविध धार्मिक विधी, पूजापाठ तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सर्व भाविकांनी श्री देव वाळकेश्वराचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
....................
किनळे येथे उद्या
वार्षिक जत्रोत्सव
सावंतवाडी ः किनळे येथील श्री देवी माऊली-सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता. ३) होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजा, अभिषेक, दुपारी नैवेद्य होणार आहे. रात्री अकराला फटाक्यांच्या आतषबाजीत सवाद्य पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवी माऊली-सातेरी देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.
.....................
तळवडेत आज
वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे ः तळवडे गेट येथील देव रवळनाथचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. २) होणार आहे. मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम, नंतर रवळनाथाला भरजरी वस्त्र व सुवर्णालंकारांसह फुलांनी सजविण्यात येईल. रवळनाथाच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. रात्री तळवडे ग्रामपंचायतन देवतांच्या सवाद्य तरंगांसह फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणुकीनंतर उशिरा मामा मोचेमाडकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.
.......................
आचऱ्यात रविवारी
‘वेसरोत्पत्ती’ नाटक
आचरा ः भटवाडी येथील देवी भगवती-माऊली मंदिर वार्षिक जत्रोत्सवानिमित्त रविवारी (ता. ७) रात्री दहाला भगवती माऊली मंदिरच्या पटांगणावर दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘वेसरोत्पत्ती’ हा सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

