पारकरांकडून ३० कोटींची मागणी

पारकरांकडून ३० कोटींची मागणी

Published on

07879

पारकरांकडून ३० कोटींची मागणी

नीतेश राणेंचा आरोप; भाजपमध्ये येण्यासाठी मागणी

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १ ः येथील नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्या, सोबत ३० कोटी रूपये किंवा तेवढ्या रक्‍कमेची कंत्राटे मिळवून द्या, अशा मागण्या करून संदेश पारकर हे भाजप पक्षात येणार होते, असा दावा पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे केला. पारकर हे केवळ स्वतःसाठी मत मागून शहर विकास आघाडीचीही फसवणूक करत आहेत, असाही आरोप राणे यांनी केला.
येथील प्रहार भवन येथे त्‍यांनी पत्रकार परिषद घेतली. समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री उपस्थित होते. राणे म्‍हणाले, ‘नगरपंचायत निवडणुकीपूर्वी पारकर यांच्याशी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मी फोनवर चर्चा केली होती. त्‍यानंतर मुंबईत पारकर मला भेटले. त्‍यावेळी मला भाजपत प्रवेश द्या तसेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी आणि ३० कोटी रूपये द्यावेत, अशी चर्चा झाली होती. मात्र, नारायण राणे यांनी पारकर यांना पक्षात प्रवेश देण्यास नकार दिला. तसेच आमच्या सोबत सदैव असलेले समीर नलावडे यांनाच आम्ही नगराध्यक्ष उमेदवारी निश्‍चित केली होती.’
ते म्‍हणाले, ‘आम्‍ही पारकर यांना भाजपमध्ये प्रवेश नाकारल्‍यानंतर त्‍यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शहर विकास आघाडी केली. मात्र, तेथेही ते आघाडीमध्ये असलेल्‍या नगरसेवक उमेदवारांची फसवणूक करत आहेत. गेले दोन दिवस ते शहरात प्रचार करताना केवळ नगराध्यक्षपदालाच मत द्या, असे आवाहन करत आहेत. नगरसेवक उमेदवारांना त्‍यांनी वाऱ्यावर सोडले आहे.’
----------------
राणे फोटो लावतात; पण ठाकरेंचा नाही
पारकर हे आता ठाकरे शिवसेना पक्षाचे देखील राहिले नाहीत. त्‍यांना ही निवडणूक लढविताना राणेंचे सुपूत्र नीलेश राणे यांचा फोटो लावावा लागतो. पण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ते फोटो लावू शकत नाहीत. जे ठाकरे शिवसेनेचे होऊ शकत नाहीत ते इथल्‍या मतदारांचे देखील होऊ शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.
-----------------
07880

पुरावे द्या, आत्ता माघार घेतो

संदेश पारकर ः पराभवाची चाहूल लागल्‍याने राणेंचे आरोप

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १ ः पालकमंत्र्यांकडे मी पैसे मागितल्‍याचे पुरावे त्‍यांनी सादर करावेत. मी आत्ता नगराध्यक्ष निवडणुकीतून माघार घेतल्‍याचे जाहीर करतो, असे प्रतिआव्हान संदेश पारकर यांनी दिले. कणकवलीत भाजपला पराभवाची चाहूल लागली आहे. त्‍यामुळे आता आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. आम्हाला विकत घेण्याची भाषा बोलली जात, असेही श्री. पारकर म्‍हणाले.
येथील पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. त्‍यांच्यासोबत राजन तेली, संजय आंग्रे, सतीश सावंत आदी उपस्थित होते. श्री. पारकर म्‍हणाले, ‘कणकवली नगरपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आटोकाट प्रयत्‍न केले. पण, त्‍यांच्या नगराध्यक्ष उमेदवारासह इतर प्रभागातील उमेदवार पिछाडीवर असल्‍याचे लक्षात आले. त्‍यामुळे राणे यांनी आता वैयक्‍तिक आरोपाचे अस्त्र बाहेर काढले आहे. पण, अशा आरोपांना आम्‍ही भीक घालत नाहीत. आमच्यावर केलेल्‍या आरोपाचे पुरावे त्‍यांनी सादर करावेत, आम्‍ही नगराध्यक्ष निवडणुकीतून बाहेर पडतो. ते आरोप सिद्ध करू न शकल्‍यास त्‍यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.’
पारकर म्‍हणाले, ‘कणकवली शहर आघाडी ही पक्ष विरहीत आहे. दोन्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आघाडी आदी सर्वांनीच पक्षाचे चिन्ह, झेंडा बाजूला ठेवलाय. आमदार निलेश राणे यांची कणकवलीचे पालकत्‍व घेतलंय. त्‍यांच्याच नेतृत्वाखाली आम्‍ही लढत देतोय. तसेच प्रत्‍येक सभेत आम्‍ही वैयक्‍तिक नव्हे तर आघाडीच्या उमेदवारांना मत मागतोय. त्‍यामुळे राणेंचे आरोप निराधार आहेत.’
---------------
फोटो हटवून शिंदे, राणेंचा अपमान
कणकवलीत भाजपने आपल्‍या बॅनरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे यांचे फोटो हटवून त्‍यांचा अपमान केलाय, असा आरोप श्री. पारकर यांनी केला. तर समीर नलावडे, गोट्या सावंत हे शिंदे शिवसेनेत जाण्याची भीती असल्‍याने पालकमंत्री त्‍यांची पाठराखण करत असल्‍याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com