मालवणात सरासरी ६७ टक्के मतदान
मालवणात सरासरी ६७ टक्के मतदान
शांततेत प्रक्रिया; सर्वच केंद्रांवर चांगला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ : येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदानाच्या दिवशी शहरातील सर्वच केंद्रांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सायंकाळी सरासरी ६७ टक्के मतदान झाले असल्याचे समजते. उद्या (ता.३) होणारी मतमोजणी आता २१ डिसेंबरला होणार असल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारतो? याचे चित्र याच दिवशी स्पष्ट होणार आहे.
येथील पालिकेची सार्वत्रिक निवडणूकीचे वातावरण जात प्रमाणपत्र आणि रोकड पकडल्याच्या विषयावरून चांगलेच तापल्याचे दिसून आले. शिंदे शिवसेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. यात ठाकरे शिवसेनेने मागे न राहता महायुती न झाल्याचा व त्यांच्यातील अंतर्गत वादाचा फायदा उठविण्यासाठी ठाकरे शिवसेनेने शहरातील सर्वच प्रभागात प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे आजच्या मतदानाच्या दिवशी मतदारांचा प्रतिसाद कसा राहतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
आज सकाळी शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर साडेसातला मतदानाच्या प्रक्रियेस सुरवात झाली. सकाळपासूनच मतदार केंद्रांवर मतदान करण्यासाठी दाखल होत असल्याचे दिसून आले. दिव्यांग, वयोवृद्ध महिलांचाही यात समावेश होता. पोलिस तसेच स्थानिक नागरिक त्यांना मतदान केंद्रात नेताना दिसून आले. ज्येष्ठ मतदारांना सकाळच्या सत्रात मतदानाचा आग्रह धरताना कार्यकर्ते दिसले. यासाठी रिक्षांचीही व्यवस्था होती. भंडारी हायस्कूलच्या केंद्रांवर दोन नववधूंनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीडपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान विविध केंद्रांवर झाले होते.
मतदान केंद्रांपासून काही अंतरावर शिंदे शिवसेना, भाजप, ठाकरे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे टेबल होती. या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत होती. जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात होते.
शहरातील रेवतळे येथील फाटक शाळा केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने एक तास मतदार ताटकळत उभे होते. एक तासानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत झाली. अन्य सर्व केंद्रांवर शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त होता. प्रभागातील सर्व ठिकाणी पोलिसांची गस्त होती.
सकाळच्या सत्रात आमदार नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शहरातील अनेक ठिकाणी भेट देत पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला. ठाकरे शिवसेनेच्या माजी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनीही आढावा घेतला. सर्वच मतदान केंद्रावर शेवटच्या टप्प्यात मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. आता नगराध्यक्ष कोणाचा? व सत्ता कोणाची येणार? हे चित्र आता २१ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.
--------------
08136
08137
फुल विक्रेत्यांना आर्थिक फटका
मालवण पालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असल्याने शहरातील विविध फुल विक्रेत्यांनी गोंडे, गुलाब यासह अन्य फुले मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून घेतली होती. यात बऱ्याच विक्रेत्यांनी आकर्षक हारही बनवून ठेवले होते. मात्र, मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने या हारांचे आता करायचे काय? असा प्रश्न फुल विक्रेत्यांना पडला आहे. यात त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

