दापोली-गुड नाईट मधील द्रव प्यायलेली जुळी बचावली
८३०६
डासप्रतिबंधक द्रव प्यायलेली
पुण्यातील जुळी बचावली
पर्यटक कुटुंबाची घालमेल ः दापोलीत उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३ ः तालुक्यातील मुरूड येथे पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील दोन वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांनी आई-वडिलांची नजर चुकवून चक्क डासप्रतिबंधक द्रव प्यायले. दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत केलेल्या उपचारांमुळे दोन्ही बाळांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. त्या दोघांवरही वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत यांनी उपचार केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील मुरूड येथील प्रसिद्ध असलेल्या एका रिसॉर्टमध्ये पुणे बावधन परिसरातील त्रिपाठी कुटुंब पर्यटनासाठी आले होते. पर्यटकांच्या दोन जुळ्या चिमुकल्यांनी हॉटेलच्या रूममध्ये डासप्रतिबंधक मशीन ओढून त्यातील द्रव प्राशन केले. त्यामुळे खळबळ उडाली. काही वेळातच हा सगळा धक्कादायक प्रकार त्यांच्या आई-वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ याची माहिती हॉटेल व्यवस्थापनाला दिली. हॉटेल व्यवस्थापनानेही त्या मुलांना व पर्यटकांना दापोली येथील बालरुग्णालय गाठले; मात्र दोन्ही खासगी बालरुग्णालयात डॉक्टर उपस्थित नव्हते. संध्याकाळी सातच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.
ही माहिती दापोली येथील बुरोंडी नाका परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भाई झगडे, सुयोग घाग व स्वप्नील जोशी यांना समजली. त्यांनी तत्काळ त्रिपाठी कुटुंबीयांना सहकार्य केले. त्यांनी शासकीय दापोली उपजिल्हा रुग्णालय गाठले. दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पवन सावंत यानी दोन्ही बालकांवर तत्काळ उपचार सुरू केले. त्या दोन वर्षांच्या चिमुकल्या बाळांनी रडून रडून गोंधळ घातला होता. या प्रकारामुळे त्यांचे आई-वडीलही कासावीस झालेले होते. उपचारामुळे त्या दोघांचीही प्रकृती स्थिर झाली होती. पुढील उपचाराकरिता त्या दोन्ही मुलांना पुण्यात हलविले आहे. या घटनेची नोंद दापोली उपजिल्हा रुग्णालय आणि दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

