निवडणूक निकाल लांबण्याची पहिलीच घटना

निवडणूक निकाल लांबण्याची पहिलीच घटना
Published on

निवडणूक निकाल लांबण्याची पहिलीच घटना
योगेश कदम ः आगामी निवडणुकीचे नियोजन काटेकोर व्हावे
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत आजवर कधीही न पाहिलेला गोंधळ या वेळी अनुभवायला मिळाला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार होता; मात्र न्यायालयाच्या निर्णयाने निकाल सुमारे २० दिवसांनी जाहीर होणार आहे. राज्यातील निवडणुकांच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडत आहे, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
खेड माध्यम प्रतिनिधींबरोबर बोलताना ते म्हणाले, काही ठिकाणी निवडणुका रद्द झाल्यामुळे त्याचा परिणाम आगामी नगरपालिका निवडणुकांवर होऊ शकतो, याची शक्यता पाहून न्यायालयाने निकाल स्थगित करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला आदेश लागू होणारच असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र निकाल जाहीर करण्यातील विलंब हा प्रशासनाच्या नियोजनातील मोठा घोळ आहे. मतदानानंतरच्या दुसऱ्याच दिवशी निकाल देण्याची प्रक्रिया असताना, २० दिवसांचे अंतर निर्माण होणे हे निवडणूक व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीकडे निर्देश करते.
यापुढे होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी काटेकोर आणि अचूक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. तसेच निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा गोंधळ पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
---
चौकट
प्रक्रियेत नियोजनबद्धता हवी
निवडणूक हा लोकशाहीचा मुख्य आधार असून, अशा प्रकारच्या प्रशासकीय चुका नागरिकांचा विश्वास ढळवू शकतात. त्यामुळे भविष्यातील सर्व निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियोजनबद्धता आवश्यक आहे, असे गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com