मोबाईल मनोरा वस्तीत उभारूच नका

मोबाईल मनोरा वस्तीत उभारूच नका

Published on

08731

मोबाईल मनोरा वस्तीत उभारूच नका

वाफोलीवासीय ः दूरसंचार कंपनीचे विनापरवाना काम रोखले

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः वाफोली येथे एका खासगी दूरसंचार कंपनीकडून भर वस्तीत विनापरवाना उभारण्यात येणाऱ्या मोबाईल मनोऱ्याचे काम स्थानिक ग्रामस्थांनी रोखले. यावेळी ग्रामपंचायतीने कंपनीला ना हरकत दाखला दिला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. आमचा मनोऱ्याला विरोध नसून तो भर वस्तीत न उभारता अन्यत्र वस्तीपासून दूर उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत स्थानिकांनी जिल्हाधिकारी, सावंतवाडी तहसीलदार व बांदा तलाठी यांना तक्रारीचे निवेदन दिले आहे.
कंपनीने मनोरा उभारताना स्थानिक प्रशासनाला कोणतीही कल्पना दिली नाही अथवा लेखी परवानगीही घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनोरा उभारण्याचा कुठलाही प्रस्ताव आमच्याजवळ आलेला नाही अथवा पत्रव्यवहार झालेला नाही, असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासनाने सविस्तर चौकशी केली असता, मनोरा उभारण्यात येत असलेल्या जागेबाबत कोणतीही कागदपत्रे, संबंधित जागा मालकाचे संमतीपत्र, भाडेकरार, जागा अकृषित (एनए) वापराबाबत प्रमाणपत्र आदी आवश्यक असणारी कोणतीही कागदपत्रे सादर न करता कामास सुरुवात केली होती. तसेच वाफोली ग्रामपंचायत हद्दीत मनोरा मंजूर झाल्याबाबत कोणतेही दस्तऐवज अर्जासोबत दिसून येत नाहीत. वाफोली गावात मनोरा मंजूर झाल्यास कोणत्या ठिकाणी बांधण्यात येणार, याबाबत कोणतीही कल्पना संबंधित विभागाकडून अथवा कंपनीकडून व जमीन मालकाकडून ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेली नाही, असेही ग्रामंचायतीने विशेष सभेत स्पष्ट केले. ही कंपनी कोणतीही परवानगी न घेता मनमानी कारभार चालवत गावच्या मधोमध हा मनोरा उभारण्याचा प्रयत्न करत होती. हे गावातील नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले.
--
भविष्यात अति रेडिएशनमुळे धोका
हा मनोरा गावाच्या मधोमध असल्याने ग्रामस्थांच्या जीवाला भविष्यात अति रेडिएशनमुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसेच तेथील फळबागांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी या मनोऱ्याला तीव्र विरोध केला. मनोरा उभारण्यास आमचा विरोध नाही; मात्र लोकांच्या जीवाशी खेळून असे प्रकल्प येत असतील तर आमचा तीव्र विरोध असेल. असे प्रकल्प गावच्या वेशीवर किंवा निर्जन स्थळी असावेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com