पर्यावरण संवर्धनात महिलांचा सहभाग महत्त्वाचा
rat7p4.jpg-
08995
प्रशांत परांजपे
वसा वसुंधरा रक्षणाचा... लोगो
इंट्रो
आता ती वेळ आली आहे. प्रत्येक महिलेने पर्यावरण संवर्धनात पदर खोचून, सीमेवर रणरागिणी होऊन निसर्ग संवर्धनार्थ उभे राहण्याची. जिच्या हाती स्वच्छतेची दोरी, ती जगाशी उद्धारी. माता-भगिनींनो, तुम्ही सक्षम आहात आणि तुम्हीच तुमच्या पंतवंडांसाठी तरी आता निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनात पुढे येणे गरजेचे आहे.
– डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
पर्यावरण संवर्धनात महिलांचा सहभाग महत्त्वाचा
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाशी उद्धारी’ याप्रमाणेच ‘जिच्या हाती स्वच्छतेची दोरी, ती जगाशी उद्धारी’, असे म्हणण्याची आता वेळ आली आहे. कारण प्रत्येकाचं घर-संसार हे घरातील ‘तिच्या’ भोवती फिरत असतं. आई, पत्नी, मुलगी, बहीण, आजी ही सर्व महत्त्वाची नाती; मात्र दुर्दैवाने चुकीच्या समजुतीमुळे या प्रत्येकाच्या संसारातील महत्त्वाच्या घटकाला गृहित धरलं जात असतं. आज मात्र या मंडळींच्याच मुळे जे काही पर्यावरण शिल्लक आहे, ते शिल्लक असून आता उद्याचा येणारा धोक्याचा कालावधी रोखण्यासाठी या महिला वर्गालाच प्राधान्याने कंबर कसावी आणि पदर खोचून झाशीच्या राणीप्रमाणे पुन्हा एकदा राष्ट्राच्या, पृथ्वीच्या संरक्षणासाठी, भूमातेच्या संरक्षणासाठी उभे राहणं काळाची गरज निर्माण झाली आहे.
ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवनातून ‘जल, जमीन, वृक्ष’ हे तीन शब्द पुसून टाकले तर आपलं जीवन कोलमडून पडेल, त्याच पद्धतीने आपल्या जीवनातून ‘स्त्री’ हे एक अक्षर, पण अतिशय महत्त्वाचं अक्षर पुसून टाकलं तर काय गोंधळ माजेल, याचा प्रत्येकाने विचार करावा.
प्रत्येकाचं घर नीटनेटकं ठेवण्यासाठी, प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपण्यासाठी, प्रत्येकाला हवं-नको ते पाहण्यासाठी, सर्वांच्या शेवटी किंवा स्वतःसाठी करपलेलं उरलेलं घेऊन जी माऊली आपल्या मुलाबाळांना पोटभर खाऊ घालते, शाळेसाठी तयार करते, नवऱ्याला ऑफिसला किंवा उद्योगासाठी तयार करते, त्यांना सर्व बाबतीत सांभाळते. तीच दुर्दैवाने ‘तुला काय कळतं?’ या तीन शब्दांत मोजली जाते. अर्थात, याला अपवादही आहेत. आजच्या नव्या युगात महिलांना प्राधान्य देणारी, त्यांच्या विचारांना मान देणारी माणसंच नव्या पिढीत मोठ्या प्रमाणावर आढळतात.
सध्याचा काळ हा विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आम्ही वारंवार नमूद करत आलो आहोत की २०५० नंतर पृथ्वीच्या अतिसंहाराची सुरुवात होत आहे, किंबहुना त्याची नांदी सुरू झालेली आहे. जगाच्या विविध भागांमध्ये कधी अतिवृष्टी, कधी अतिथंडी, तर कधी अति उष्णतामान यामुळे मानवाचे जीवन दोलायमान झाले आहे. या स्त्रीला तिच्या ताकदीची जाणीव करून देऊन, जगातील बदललेल्या मानसिकतेला सुधारण्यासाठी या ताकदीचा वापर करण्यासाठी आज आम्ही प्रोत्साहित करत आहोत.
जशा घरातील स्त्री घराला घरपण देते, तसंच या भूमीवर असलेलं एक झाडही आपल्या भूमीला सावरत असतं. घरातील स्त्रिया ज्या प्रकारे आपले घर रोज आवरतात, स्वच्छ ठेवतात, नीटनेटके ठेवतात, तशीच सवय त्या घरातील लहान-थोरांना आणि स्वतःला ‘पुरुष समजणाऱ्या’ वृत्तीला लावणं अत्यावश्यक आहे.
घराची साफसफाई झाल्यानंतर शाळेत जाताना मुलाबरोबर कचऱ्याची पिशवी देणे किंवा नवरा कामावर जात असताना गाडीवरून कचऱ्याची पिशवी घेऊन जाऊन वाटेतल्या ओहोळ, नदीनाला, पुलाखाली फेकून देण्याची प्रवृत्ती याला आळा घालण्याची प्राथमिक जबाबदारी ही घरातील महिलेची आहे.
घरातील कचऱ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी घरातील पुरुष समजणाऱ्या व्यक्तीला द्यायची आहे. कचरा घरातील सगळ्यांनी निर्माण करायचा आणि तो फक्त स्त्रियांनीच आवरायचा, हे जसं चुकीचं आहे, तसंच निसर्गात कुठेही कचरा पडू नये, याची जबाबदारी घरातील प्रत्येक सदस्यांनी घेणे अत्यावश्यक आहे.
याकरिता स्त्रियांनी आपल्या दागिन्यांच्या हट्टाबरोबरच घरात तीन डस्टबिन असलेच पाहिजेत असा हट्ट पतिराजांकडे करावा. ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी खतनिर्मिती करण्याचा आग्रह धरावा. फावल्या वेळात मोबाईलवर ‘कचरा वर्गीकरण’ असे गुगलवर शोधून माहिती जमा करावी. आपल्या पाल्याला पर्यावरणीय प्रकल्प म्हणून ‘टाकाऊतून टिकाऊ’ वस्तू. उदा. फ्लॉवरपॉट, हॅंगिंग बनवण्यासाठी प्रोत्साहित करावं.
आजच्या नव्या युगात पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या काही स्त्रियांचा परिचय करून देणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात मेधा पाटकर यांनी पर्यावरण आणि मानवी हक्कांच्या संवर्धनासाठी मोहीम राबवली आहे. निर्मला कांदळगावकर यांनी ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती क्षेत्रात काम केलं. डॉ. अर्चना गोडबोले यांनी काही एकरची जंगलनिर्मिती केली. प्रिया भिडे यांनी ओल्या कचऱ्यापासून टेरेस गार्डन विकसित केले. अश्विनी भट ‘झाडं वाचवणारी महिला’ म्हणून ओळखल्या जातात. ममता मेहता, प्लास्टिक कचरा संकलन; सुमैरा अब्दुलअली यांनी ध्वनी प्रदूषणाविरोधात लढा दिला. डॉ. विनिता आपटे यांनी ‘तेर पॉलिसी सेंटर’च्या संस्थापक म्हणून काम केल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात पर्यावरणासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे.
आमच्या संस्थेच्या कचरा संकलन केंद्रातही घरातील स्वच्छ कचरा एक किंवा तीन महिने साठवून तो एकदाच आणणाऱ्या आणि घरच्या मंडळींना सवय लागेल अशी काळजी घेणाऱ्या महिलांची संख्याही नोंद घेण्यासारखी आहे.
* छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठं काम महिलांना करता येणं कसं शक्य आहे ?
- घरातील आणि दैनंदिन जीवनात कचरा कमी करा, प्लास्टिकचा वापर टाळा, अनावश्यक वस्तू खरेदी करू नका आणि शक्य असल्यास पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तू वापरा. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करा. वीज वाचवा, सौरऊर्जेचा वापर करा, एलईडी दिवे वापरा. पाणी जपून वापरा, पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करा.
- घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत छोटी बाग लावा, शक्य असल्यास भाजीपाला पिकवा आणि झाडे लावा. रासायनिक साबण आणि साफसफाईची उत्पादने टाळून नैसर्गिक पर्यायांचा वापर करा. स्थानिक वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये भाग घ्या आणि इतरांना प्रोत्साहित करा, जसे वंगारी माथाई यांनी केले. आणि एक रोपट दत्तक घ्या. मुलांना आणि इतर महिलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगा.
- नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनात पुढे या, कारण ग्रामीण महिलांकडे यासाठी विशेष ज्ञान असते. शेती, दुग्धव्यवसाय आणि नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनातील पिढ्यानपिढ्या मिळालेल्या ज्ञानाचा वापर करा. पर्यावरण धोरणे ठरवताना महिलांचा आवाज महत्त्वाचा आहे, त्यात सहभाग घ्या. हवामान बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांवर चर्चा घडवून आणा. पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात महिलांना अधिक संधी मिळवून द्या.
(लेखक पर्यावरणाचा शाश्वत विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत. )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

