कोकणी ऊसाच्या गोडीत नव्हे, चिंतेत वाढ

कोकणी ऊसाच्या गोडीत नव्हे, चिंतेत वाढ

Published on

बिग स्टोरी--लोगो

rat७p७.jpg, rat७p८.jpg
09071
राजापूरः उसाचा मळा.
rat७p९.jpg-
09073
राजापूरः सुरू असलेली ऊस तोडणी.
०९०६०
rat७p१०.jpg
राजापूरः गुऱ्हाळघरामध्ये तयार केलेला केमिकल विरहीत गुळ.

इंट्रो

हवामानातील बदलासह अन्य विविध कारणांमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल स्थितीचा भातशेतीवर परिणाम होताना दिसत आहे. त्यातून. भातशेतीचा उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ बिघडत चालला असून आर्थिकदृष्ट्या भातशेती परवडत नसल्याचे सांगितले जात आहे. अशातच, कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून ऊस लागवड शेतकऱ्यांसमोर नवा पर्याय निर्माण होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने हवामानामध्ये होणारे बदल, उन्हाचा तडाखा, अतिवृष्टी, कामगारांची कमतरता अशा प्रतिकूल स्थितीचा भातशेतीप्रमाणे ऊस शेतीलाही तडाखा बसत आहे. यावर्षी मे ते ऑक्टोबर अशा सुमारे सहा महिने पडलेल्या पावसामुळे ऊसाची अपेक्षित वाढ झाली नाही. फुटवे कुजण्याचे प्रमाण वाढले. यामुळे ऊसशेतीच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. कोकणातील लाल मातीत रूजवात होऊन घातलेल्या ऊसाचा गोडवा कमी होणार आहे...!
- राजेंद्र बाईत, राजापूर
------

कोकणी ऊसाच्या गोडीत नव्हे, चिंतेत वाढ
बदलत्या हवामानाचा फटका ; ३० कोटींची उलाढाल

पश्चिम महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चालवणाऱ्या ऊसाची लागवड रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात केली जाते. सुमारे पंधरा वर्षांपासून राजापूर तालुक्यातील शेतकरी ऊसाचे पीक घेत आहेत. पश्‍चिम घाटमाथ्याच्या पायथ्याशी राजापूर तालुका वसलेला असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना ऊसविक्रीसाठी बाजारपेठही उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा भागात मोठ्यासंख्येने ऊस कारखाने आहेत. राजापूरमध्ये मूर, पाचल, रायपाटण, गोठणे-दोनिवडे, केळवली, मोसम, मोरोशी, कोळंब, काजिर्डा, जवळेथर, पाजवेवाडी, मांजरेवाडी, सौंदळ, तळवडे, हरळ आदी गावांमध्ये ऊस शेती केली जाते. त्यामध्ये पाचल (५.५३ हेक्टर), रायपाटण (५.३० हेक्टर), कोळंब (५.२० हेक्टर), तळवडे (५ हेक्टर), मोरोशी (४ हेक्टर) या गावांमध्ये सर्वाधिक क्षेत्र ऊस शेतीच्या ओलिताखाली आहे. ऊस शेतीच्या माध्यमातून राजापूर तालुक्यात वर्षभरामध्ये प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्षरित्या सुमारे २५ ते ३० कोटीची उलाढाल होते. लहरी पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने कोकणातील शेतकऱ्यांकडून शेतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. याला केवळ पावसाचा लहरीपणा कारणीभूत नसून खर्चाच्या तुलनेमध्ये न मिळणारे उत्पन्न, जंगली श्‍वापदांकडून होणारी नासधूस, शेती कामे करणाऱ्या मजुरांची कमतरता, आधुनिकता अन् व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव आदी विविध कारणांचाही समावेश आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांकडून हमखास उत्पन्न देणाऱ्या ऊसाची निवड लागवडीसाठी केली जात आहे.
-----------

अतिवृष्टीने उत्पादनामध्ये घट

गेल्या काही वर्षामध्ये पावसाचे वेळापत्रक बिघडले आहे. सर्वसाधारणतः १५ जूननंतर सुरू होणारा पाऊस अलीकडील काही वर्षामध्ये मे महिन्यापासून पावसाची सुरूवात होते. त्यानंतर, पुढील चार महिने पावसाचा धुमाकूळ असतो. यावर्षी तर, मे महिन्यामध्ये आरंभ करणाऱ्या पावसाने तब्बल सहा महिने तळ ठोकला होता. या अतिवृष्टीचा भातशेतीप्रमाणे ऊस लागवडीवरही प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. जून - जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये लागवड केलेल्या ऊसाच्या रोपांना फुटवे येण्याला सुरवात होत असते; मात्र, याच कालावधीमध्ये सातत्याने पडणारा पाऊस, ऊस शेतीमध्ये साचणारे पावसाचे पाणी, सातत्याने नद्यांच्या पूराच्या पाण्याखाली सातत्याने राहणारी उस शेती यामुळे ऊसाच्या कांड्याना आलेले नवीन फुटवे कुजून गेले तर, दुसऱ्या बाजूला सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नसून ऊसाच्या कांड्या अजूनही दोन-तीन महिन्यांच्या असल्यासारख्या स्थितीमध्ये आहेत. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे ऊसाला येणारा तुराही लांबणीवर पडला आहे. या साऱ्यामुळे एकूण उत्पादनामध्ये सुमारे २० ते २५ टक्के उत्पादनात घट होवून आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तवला जात आहे.
----------

उशीरा ऊसतोडीचा आर्थिक फटका

कोकणामध्ये ऊस रूजला असला तरी ऊस तोडणाऱ्या टोळ्या पश्‍चिम घाटावरून शेतकऱ्यांना मागवाव्या लागतात. त्यामुळे घाटमाथ्यावरील भागातील ऊस तोड झाल्यानंतर, ऊसतोड करणाऱ्या टोळ्या कोकणामध्ये दाखल होतात. यावर्षी घाटमाथ्यावरील उस तोडणी उशीरा सुरू झाली असून अद्यापही सुरू आहे. त्यामुळे कोकणामध्ये यावर्षी उशीरा ऊसतोड होणार असून ऊसतोडीला सर्वसाधारणतः मार्च-एप्रिल उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उशीरा ऊसतोड झाल्यास शेतीतील जमिनीसह ऊस रोपातील ओलावा कायम राहण्यासाठी शेतीला सातत्याने पाणी द्यावे लागते. मात्र, कोकणातील नदीनाले जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून कोरडे होऊ लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना तारेवरची कसरत करावी लागते. जेवढी उशीरा ऊसतोड तेवढे वजन घटण्याचा जादा संभव असतो. या साऱ्यातून, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.
----------
रखरखीत उन्हाचा परिणाम

कोकणातील शेतकर्‍यांच्या हातामध्ये पैका मिळवून देणार्‍या आंबा, काजू आदी पिकांना हवामानासह तापमानामध्ये झालेल्या बदलावाचा प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. त्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यापासून वाढत जाणाऱ्या तापमानातून होणाऱ्या नुकसानीतून ऊस शेतीही सुटलेली नाही. मार्च महिन्यामध्ये ऊसतोड होत असल्याने तोपर्यंत शेतकऱ्याला अपेक्षित असलेले उत्पन्न मिळवून देण्यासाठी ऊसाच्या कांड्यातील ओलावा टिकून राहणे गरजेचे असते; मात्र, नेमक्या त्याच काळामध्ये उन्हाचा तडाखा राहतो. तर, दुसऱ्या बाजूला पाण्याअभावी नदीनाले कोरडे पडत असल्याने शेतीला पाणी देतानाही शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. साहजिकच, वाढत्या तापमानाचा तडाखा बसून प्रत्यक्ष ऊस तोडीच्यावेळी ऊसाच्या कांड्याचे वजन कमी भरत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
----------

ऊस तोड टोळ्यांच्या मागण्यांनी हैराण

आधीच ऊसतोड उशीरा त्यामध्ये ऊस तोड करणाऱ्या टोळ्यांच्या विविध मागण्यांचाही सामना शेतकर्‍यांना करावा लागतो. आपल्या शेतीची पहिल्यांदा तोड व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतात. त्याच्यातून होणाऱ्या शीतसंघर्षाचा फायदा ऊसतोड कामगारांकडून आपसूकच उचलला जात आहे. ऊसतोड कामगारांकडून शेतकऱ्यांकडे खुशालीची मागणी केली जाते. त्यामध्ये दरवर्षी सातत्याने वाढच होत चालली आहे. त्यातून, शंभर रूपयांपासून ते सुमारे पाचशे रुपयांपर्यंत पोहचली आहे. खुशाली देताना मांसाहारी जेवणाचाही बेत आखावा लागतो. कधी कधी ओल्या पार्टीचेही नियोजन करावे लागते. त्यांच्या रेशनसाठीही पैसेही द्यावे लागतात. उसतोड टोळ्यांना खुश ठेवताना वैतागून गेलेल्या शेतकरी मेटाकुटीस येवून अखेर ‘ऊस नको रे बाबा...’अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते.
----------

पिकविमा संरक्षण हवे

कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा, काजू आदींसह भातशेतीची लागवड होत असल्याने केंद्र शासनाच्या पिकविमा योजनेमध्ये या पिकांचा समावेश आहे. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये ऊस लागवड झपाट्याने वाढत आहे. मात्र, या ऊस लागवडीला पिकविम्याचे संरक्षण मिळत नाही. कोकणामध्ये वणवा लागण्याच्या सर्रास घटना घडत असून, त्याचा फटका या ऊस लागवडीलाही बसतो. वणव्याची ऊसाला झळ पोहचल्यास नियमित ३ हजार रूपये टन असा मिळणारा दर २२०० रूपयांवर घसरतो. ऊस जळल्यानंतर त्याची वेळेमध्ये तोड होणे गरजेचे असते; मात्र, काहीवेळा उस तोडणी मजूर उपलब्ध होत नसल्याने ऊसतोड होत नाही. त्यामध्ये शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक झळा पोहचत असल्याने कोकणातील शेतकऱ्यांकडून येथील ऊस लागवडीला पिकविम्याचे संरक्षण मिळणे, अशी मागणी केली जात आहे.
.................

कृषी विभागाचा पुढाकार मिळणार का?

लागवडीपासून तोडणीपर्यंत ऊसाला नियमित पाणी देणे गरजेचे असते. जेणेकरून ऊसाच्या कांड्याचे वजनही वाढते अन् ते ओलेही राहते. साधारणतः तालुक्यामध्ये मार्च-एप्रिलमध्ये लागवड केली जाते. त्यामुळे सुरवातीचे दोन महिने आठवड्यातून एकदा असे नियमित शेताला पाणी दिल्यानंतर पुढील पावसाळ्याचे चार महिने नैसर्गिकरित्या रोपांना पाणी द्यावे लागत नाही. यामुळे पाणी देण्यावर होणारा शेतकऱ्याचा खर्च आपोआप वाचतो. नैसर्गिक ओलावा असल्याच्या समजातून पावसाळ्यानंतरचे पुढील दोन महिने शेतकऱ्याकडून पाणी देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. साहजिकच त्याचा फटका बसून तोडणीच्यावेळी ऊसाच्या कांड्याचे अपेक्षित असलेले वजन भरताना दिसत नाही. एकरी ४०-४५ टन अपेक्षित असलेल्या उत्पादनामध्ये घट होऊन तो ३०-३२ टनावर येतो. त्याचा शेतकऱ्याला आर्थिक फटका बसत असल्याने शेताला पाणी देण्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रबोधन आणि मार्गदर्शनासाठी कृषी विभागाकडून पुढाकार घेणे गरजेचे आहे.
----

राजापुरात गुऱ्हाळ

गेल्या काही वर्षामध्ये तालुक्यात ऊस शेतीमध्ये वाढ झाली आहे. या ठिकाणी पिकणारा ऊस बहुतांश शेतकरी पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यामध्ये विक्रीसाठी पाठवतात; मात्र, वाढता पिकणारा ऊस लक्षात घेऊन राजापूर तालुक्यामध्ये आता गुर्‍हाळे सुरू झाली आहेत. त्यामध्ये तळवडे येथील पितांबरी प्रॉडक्टस प्रा. लि.ने सुरू केलेल्या गुऱ्हाळाचा समावेश आहे. या गुर्‍हाळांसाठी राजापूर तालुक्यासह सिंधूदूर्ग जिल्ह्यातील शेतकरी आपल्या ऊसाची विक्री करतात. या गुर्‍हाळामुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी ऊस कारखान्यामध्ये पाठविण्याऐवजी स्थानिक पातळीवरील गुर्‍हाळांसाठी विक्री करणे अधिक सोयीचे ठरत आहे. त्यातून, ऊस विक्रीसाठी स्थानिक पातळीवर पर्याय निर्माण झाला आहे. त्याचवेळी या गुर्‍हाळाच्या माध्यमातून अनेकांना स्थानिक पातळीवर नियमित रोजगारही उपलब्ध झाला आहे.
-----

गवारेड्यांसह वन्यप्राण्यांचा ऊस शेतीला धोका

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत गेल्या काही वर्षामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूची लागवड झालेली आहे. त्याच्या जोडीला अनेक शेतकर्‍यांनी नारळ, पोफळी, सुपारीचीही लागवड केलेली आहे. यासह गेल्या पंधरा वर्षामध्ये ऊस शेतीही बहरू लागली आहे. मात्र, भातशेती, आंबा, काजूची कलमे, नारळ, सुपारीची झाडे यांचे नुकसान करणाऱ्या गव्यांनी आता आपला मोर्चा ऊस शेतीकडे वळवला आहे. गेल्या पंधरा वर्षापासून ऊस शेती करणारे कोळंब येथील शेतकरी राजाराम पाटेकर यांनी गेल्यावर्षीपासून ऊसशेतीचे गवारेड्यांकडून नुकसान होत असल्याचा अनुभव सांगितला. गवारेड्यांकडून होणार्‍या नुकसीनीची शासनाकडून नुकसान भरपाई मिळत असली तरी, त्याचे प्रमाण प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेमध्ये तुटपूंजे असते. तेही वेळेत मिळत नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीसोबत भातशेती, ऊसशेतीचे गवा आणि अन्य वन्यप्राण्यांकडून होणार्‍या नुकसानीचा समावेश केलेला नाही. त्यामुळे पिकविम्याचे संरक्षण देताना गवा आणि अन्य वन्यप्राण्यांकडून होणार्‍या नुकसानाचाही समावेश व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
----

ऊसाचे वार्षिक अर्थकारण

अपेक्षित सरासरी प्रत्यक्षात सरासरी
एकरी ऊस उत्पादन ४०-४५ टन ३०-३२ टन
एकरी ऊस खर्च ४०-४५ हजार
एकरी ऊस उत्पन्न १ लाख रुपये ८० हजार रुपये
----
पॉइंटर
ऊस उत्पादकांना भेडसावणार्‍या समस्या
* बदलणाऱ्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम
* मजुरांची कमतरता,त्यांच्या वाढत्या मागण्या
* अनेक शेतांमध्ये वीज उपलब्ध नाही
* शेतीपंपासाठी डिझेल वापराने खर्चामध्ये वाढ
* जंगली श्‍वापदे, डुक्करे, रानगव्याकडून नासधूस
* वेळेवर ऊस तोडणीसाठी मजूरांवर जादा खर्च
* वणवा लागून आर्थिक नुकसान
* पिकविम्याच्या फायद्यापासून वंचित

कोट
rat७p१३.jpg-
09063
राजाराम पाटेकर

गेल्या पंधरा वर्षापासून ऊस शेती करीत आहे. हवामानातील बदल, अतिवृष्टी, अति तापमान, वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान यांसह अन्य विविध समस्यांचा ऊस शेतीलाही सामोरे जावे लागते. त्याच्यातून आर्थिक नुकसान होत असले तरी, खर्चाच्या तुलनेमध्ये उसशेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने ऊस शेती शाश्‍वत उत्पन्नाच्यादृष्टीने कोकणातील शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. ऊसशेतीला बळ मिळण्यासाठी कोकणातच ऊस कारखान्याची उभारणी होणे गरजेचे आहे. पिकविम्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे.
- राजाराम पाटेकर, शेतकरी, कोळंब
..............
कोट
rat७p११.jpg.jpg
09061
महेश विचारे

पहिल्या वर्षानंतर पुढील दोन वर्ष उस लागवडीसाठी फारसा खर्च करावा लागत नाही. ऊसाची शेती करण्यासाठी फारशी मेहनतही करावी लागत नाही. खर्चाच्या तुलनेमध्ये ऊस लागवडीतून चांगले आणि समाधानकारक उत्पन्न मिळत आहे. मात्र, यावर्षी तब्बल सहा महिने सातत्याने बरसलेल्या पावसाचा तडाखा ऊसशेतीला बसून त्याच्यातून, सुमारे २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे.
- महेश विचारे, गोठणेदोनिवडे
-------
कोट
rat७p१२.jpg-
09062
विलास हर्याण

कोकणामध्ये विशेषतः राजापूर तालुक्यामध्ये ऊसाचे पीक चांगले येत आहे. ऊसाचे पिक घेताना शेतकऱ्याला विविध अडचणींचा सामना करावा लागत असला तरी, उत्पन्न समाधानकारक मिळत आहे. गेल्या काही वर्षामध्ये ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याने शासनाने पिक विमा संरक्षणामध्ये कोकणातील ऊस लागवडीचा प्राधान्याने समावेश करावा.
- विलास हर्याण, केळवली
-------
कोट
rat७p१४.jpg-
09064
कुंजन साळवी

कोकणामध्ये ऊस चांगला होत असून ऊस शेती फायदेशीर ठरत आहे. मात्र, यावर्षी मे ते ऑक्टोंबर या दरम्यान सातत्याने राहीलेल्या पावसाचा उस शेतीला फटका बसल्याचे चित्र आहे. सतत पडलेल्या पावसामुळे ऊसाच्या लागवड केलेल्या रोपांची अपेक्षित वाढ झालेली नाही. शेतामध्ये पाणी साचल्याने फुटवेही कुजून गेले आहे. त्यातून, ऊसाच्या उत्पादनामध्ये यावर्षी वीस ते पंचवीस टक्क्याची घट होण्याची शक्यता आहे. याचा ऊस शेतीच्या अर्थकारणावर थेट परिणाम होणार आहे.
- कुंजन साळवी, शेती अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com