मालगुंड येथे भंडारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
मालगुंडात भंडारी लीग क्रिकेट स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः तालुक्यातील मालगुंड येथे सलग तिसऱ्या वर्षी भंडारी प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड येथील कै. नानासाहेब मयेकर क्रीडांगणावर ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर लिलाव प्रक्रिया करून १६ संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एक लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ही स्पर्धा २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत विजेत्या संघाला ५१ हजार रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला ३१ हजार रोख व चषक, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक २१ हजार रोख व चषक, चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक ११ हजार रोख व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूलादेखील गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी निखिल बोरकर, चेतन बोरकर, प्रल्हाद हळदणकर आणि पंकज नार्वेकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

