अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा छंदोत्सव
‘अभ्यंकर’ महाविद्यालयाचा छंदोत्सव
सुवर्ण महोत्सवी वर्ष; सांस्कृतिक कलाकृतीसह क्रीडा स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. येत्या सोमवारपासून (ता. १५) २४ डिसेंबरपर्यंत छंदोत्सवातून विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक कलाकृती, क्रीडास्पर्धांतील कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. महाविद्यालयाचे छंदोत्सवाचे हे १८वे वर्ष आहे.
महोत्सवात १५ ते १८ डिसेंबरपर्यंत विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. १९ डिसेंबरला दुपारी २ वा. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध प्रदर्शनांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये फोटोग्राफी, रांगोळी, चित्रकला, हस्तकला स्पर्धा व फूडस्टॉल यांचे उद्घाटन होईल. ३ वा. जवाहर क्रीडांगण येथून ‘शोभायात्रा’ काढण्यात येईल. ४ वा. छंदोत्सवाचे व फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ५ वा. शामराव करंडक एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन होईल. एकांकिकेसाठी शब्द एक आविष्कार अनेक हे सूत्र असलेल्या या स्पर्धेसाठी ‘नातीगोती’ हा शब्द देण्यात आला आहे. २० डिसेंबरला सकाळी १० वा. गीतगायन स्पर्धा, १२ वा. एकल नृत्यस्पर्धा, २ वा. समूहनृत्य स्पर्धा आणि सायं. ४ वा. बक्षीस वितरण समारंभ होईल. तसेच त्या त्या दिवशी माजी विद्यार्थी कलाकारांना घंटानाद सन्मान प्रदान केला जाईल. २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत सर्व क्रीडाप्रकाराचे मैदानी सामने पार पडतील. सायंकाळी ४.३० वा. वार्षिक क्रीडा स्पर्धेतील स्पर्धकांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

