शहरात ध्वनीघोषणाद्वारे जनजागृती करा
गुहागरात ध्वनीघोषणाद्वारे जनजागृती करा
मनसेचे निवेदन ; नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १३ : गुहागर नगरपंचायत क्षेत्रात नागरिकांना केल्या जाणाऱ्या सूचना, विविध योजना यांची जनजागृती ही सोशल मीडियावर केली जाते तसेच ती ध्वनीघोषणाद्वारे घंटागाडीच्या माध्यमातून करावी. पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक बिघाड, दुरुस्तीची कामे, पाणीपुरवठा विभागातील समस्या यामुळे पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्यास किंवा कचरागाडी येणार नसल्यास एक दिवस आधी येणार नसल्याची सूचना देण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
विविध मागण्यांचे निवेदन मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहराध्यक्ष विक्रांत सांगळे यांच्या हस्ते नगरपंचायतीला देण्यात आले. या वेळी मनसेचे गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर, तालुका सचिव प्रशांत साटले, मनविसे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, विभाग अध्यक्ष दर्शन जांगळी, आकाश जांगळी, निशांत सांगळे तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. शहरातील पाणीपुरवठा खंडित होण्याच्या कालावधीत नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना वेळेवर माहिती मिळावी आणि गैरसमज टाळता यावेत यासाठी आपण ध्वनी-घोषणा घंटागाडीद्वारे संपूर्ण नगरपंचायत कार्यक्षेत्रात ही सूचना प्रसारित करावी.

