मुंबईत २२ डिसेंबरला ''एक सूर एक ताल''
मुंबईत २२ डिसेंबरला
‘एक सूर एक ताल’
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः सिंधुदुर्गचे सुपुत्र, प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री (कै.) वसंत देसाई यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त २२ डिसेंबरला मुंबई येथील शिवाजी पार्क येथे बालक मेळावा आयोजित केला आहे. यावेळी ‘एक सूर एक ताल’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगीतकार सोमनाथ परब यांनी केले आहे.
(कै.) वसंत देसाई यांनी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक गीतांना संगीत साथ दिली आहे. संगीतात भारतीय वाद्यांचा कौशल्यपूर्व वापर करून आपले संगीतावरील प्रभुत्व त्यांनी सिद्ध केले आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात १९५४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक लाख शालेय मुलांकडून राष्ट्रगीत एका सुरात, एका तालात म्हणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या ‘एक सूर एक ताल’ या कार्याची जबाबदारी तत्कालीन शिक्षणमंत्री (कै.) मधुकरराव चौधरी आणि प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या प्रोत्साहनामुळे गेले ४५ वर्षे वसंत देसाई यांचे शिष्य, संगीतकार सोमनाथ परब समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन २२ डिसेंबरला सकाळी आठला (कै.) वसंत देसाई चौक, किर्लोस्कर मार्ग, समर्थ व्यायाम मंदिर शेजारी, शिवाजी पार्क, दादर येथे होणार आहे. या कार्यक्रमात युवा कला मंच महाराष्ट्र व स्वरांगण संगीत समूहाचे कलाकार आणि शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षकांचा सहभाग आहे. संगीतकार देसाई यांनी स्वरबद्ध केलेली गाणी सोमनाथ परब हे सादर करणार असून, यावेळी भजनसम्राट अनुप जलोटा यांच्याहस्ते पुष्पांजली अर्पण केली जाणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील मान्यवर संगीतकार उपस्थित राहणार आहेत.

