संक्षिप्त
Rat१६p५.jpg-
P२५O११००३
मंडणगड ः शिक्षक आनंद सुतार यांचे अभिनंदन करून राज्यस्तरासाठी शुभेच्छा देताना गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे.
मंडणगडमधील आनंद सुतार यांच्या
शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरावर निवड
मंडणगड ः राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (पुणे) तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्यावतीने शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित शैक्षणिक साहित्यनिर्मिती स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील अडखळ शाळेचे उपशिक्षक आनंद सुतार यांनी तालुका आणि विभागस्तरावर यश मिळवले आहे. सातारा येथे झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेत एकूण ४७ स्पर्धकांमधून मानवी अस्थिसंस्था आणि अंतरिंद्रिये या विषयावर त्यांनी सादर केलेल्या शैक्षणिक साहित्याला परीक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ते रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे यांनी त्यांचा गौरव केला.
श्रमदानातून २२ वनराई बंधाऱ्यांची उभारणी
मंडणगड ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत माहू बोरघर ग्रुपग्रामपंचायतीमध्ये जलसंवर्धन व पर्यावरण स्वच्छतामोहीम १५ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडली. या मोहिमेत माहू गावठाणातील ग्रामस्थ व महिलांच्या श्रमदानातून माहू स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आतापर्यंत जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारे एकूण २२ बंधारे बांधण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांच्या पुढाकाराने माता रमाईनगर परिसरात जलसंवर्धनासाठी वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. या उपक्रमात ग्रामस्थ अध्यक्ष व माजी सरपंच दिनकर हुंबरे, माजी सरपंच दीप्ती जाधव, संदीप म्हसकर, गोपीनाथ जाधव, अशोक लाखन, प्रकाश नामुगडे, प्रणाली नामुगडे, दर्शना नामुगडे, ग्रामपंचायत अधिकारी सुप्रिया चांदिवडे आदींनी सक्रिय श्रमदान केले.
ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिर
नायणे येथे गुरुवारपासून
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्यावतीने ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिर तालुक्यातील नायणे येथे १८ ते २४ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात गावाच्या सर्वांगीण स्वच्छतेसह विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शिबिरात ५५ स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. शिबिराचे उद्घाटन १८ डिसेंबरला दुपारी ३.३० वा. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा संपदा पारकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे उपस्थित राहणार असून, ग्रुपग्रामपंचायत देव्हारेच्या सरपंच प्रमिला दळवी, सहकार्यवाह विश्वदास लोखंडे, उपसरपंच तुषार करावडे, प्रतिष्ठित नागरिक संजीव येसावरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
मंडणगडचा जनता बाजार २१ रोजी
मंडणगड ः मंडणगड तालुक्यातील घरगुती उद्योग, स्थानिक उद्योजक व युवकांना व्यासपीठ देणाऱ्या ‘मंडणगड जनता बाजार’ या उपक्रमाची सुरुवात रविवारी (ता. २१) सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत होणार आहे. मंडणगड घडवा, मंडणगड वाढवा, मंडणगड जगवा या संकल्पनेतून सुरू होणारा हा उपक्रम दर रविवारी नियमितपणे होणार आहे. मुंबई-पुण्यात यशस्वी झालेल्या मंडणगडकर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, बिझनेस सेशन, विक्री, नेटवर्किंग व प्रेरणादायी बिझनेस टॉकचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम लिटिल लॉर्डस् इंटरनॅशनल अॅक्टिव्हिटी सेंटर, मंडणगड येथे होणार असून, यशतेज फाउंडेशन बिझनेस फोरमसह विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे.
rat१६p८.jpg ः
२५O११००६
तुळशी: न्यू इंग्लिश स्कूल, तुळशी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य उमेश लकेश्री सोबत मुख्याध्यापिका श्रद्धा नटे, खंदारे.
व्यावसायिक शिक्षण काळाची गरज ः लकेश्री
मंडणगड ः कला ही जीवनाची सावली आहे तर व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा असून, उच्च गुणवत्ता, नवनिर्मितीचा ध्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन असल्यासच यशस्वी होता येते व समाजात आपले स्थान निर्माण करता येते, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय सावर्डेचे प्राचार्य उमेश लकेश्री यांनी सांगितले. ते न्यू इंग्लिश स्कूल तुळशी येथे ११ डिसेंबर रोजी करिअर गाइडन्स या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देताना बोलत होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी आपल्या आवडीनुसार योग्य संधी शोधाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

