पडवे हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे समयसूचकतेने वाचले प्राण
11972
पडवे हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे
समयसूचकतेने वाचले प्राण
मांजरेकरांच्या ‘प्लेटलेट्स’ने आधार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः श्रीकृष्ण शंकर भोगटे या रुग्णाला एसएसपीएम हॉस्पिटल, पडवे येथे ‘प्लेटलेट्स’ची तातडीची गरज निर्माण झाली होती. ही माहिती मिळताच ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेचे कार्यकर्ते जय मांजरेकर यांनी तातडीने धावून जात प्लेटलेट्स दान करून सामाजिक बांधिलकी जपली.
सोमवारी (ता. १५) रुग्णाला कोणत्याही रक्तगटाच्या प्लेटलेट्सची तातडीने आवश्यकता होती. रक्तमित्र अमित गवंडळकर यांनी याबाबत ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्था सचिव बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधला. गवंडे यांनी संस्थेच्या समूहावर माहिती टाकताच उभादांडा येथील मांजरेकर यांनी अवघ्या अर्ध्या तासात हॉस्पिटल गाठले आणि प्लेटलेट्स दान केले. मांजरेकर यांनी आतापर्यंत २४ वेळा रक्तदान आणि २ वेळा प्लेटलेट्स दान केले आहे. यावेळी साईराज गिरप हे देखील आले होते. मात्र, गरज पूर्ण झाल्याने त्यांना राखीव ठेवले. या दोन्ही तरुणांनी दाखवलेल्या समयसूचकतेबद्दल ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्था आणि रुग्णाच्या नातेवाइकांनी त्यांचे आभार मानले.

