आरोंदा हायस्कूलमध्ये २९ ला चित्रकला स्पर्धा
आरोंदा हायस्कूलमध्ये
२९ ला चित्रकला स्पर्धा
आरोंदा, ता. २४ः आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, आरोंदा संचलित आरोंदा हायस्कूल यांच्या वतीने डॉ. पी. वाय. नाईक पुरस्कृत, पत्नी (कै.) पुष्पा प्रभाकर नाईक स्मृतिप्रित्यर्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सोमवारी (ता.२९) येथील हायस्कूल येथे पार पडणार आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील शाळांसाठी ही स्पर्धा खुली असून पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटांत घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटात प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय दोन हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ एक हजार रुपये रोख पारितोषिकासह प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटासाठी पाच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. चित्रकलेचे विषय स्पर्धेच्या वेळी दिले जातील. स्पर्धा सकाळी दहा वाजता सुरू होऊन निकाल व पारितोषिक वितरण त्याच दिवशी दुपारी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी लागणारे कागद आयोजकांकडून पुरविले जातील, तर रंग व इतर साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणावयाचे आहे. स्पर्धकांसाठी भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी दिनांक २५ डिसेंबरपर्यंत स्वतः येऊन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे नावनोंदणी करावी. नावनोंदणीसाठी कलाशिक्षक चंदन गोसावी, मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

