एखादी तरी कला जीवापाड जोपासा
13508
एखादी तरी कला जीवापाड जोपासा
एकनाथ आव्हाड : काणेकर ट्रस्टच्या पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २७ : प्रत्येकाने एखादी तरी कला जीवापाड जोपासली पाहिजे, कारण ती व्यक्तिमत्व फुलवते, आनंद देते आणि माणुसकी जपण्यास मदत करते. माणूस माणसाला जोडला की देश आपोआप जोडला जातो, असे प्रतिपादन साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक एकनाथ आव्हाड यांनी केले.
कणकवली नगरवाचनालयाच्या अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात कलातपस्वी अप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यात श्री.आव्हाड बोलत होते. यावेळी पहिल्या कलातपस्वी जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबुराव शिरसाट यांना गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी कोकणचे ख्यातनाम साहित्यिक राम मेस्त्री होते.
कार्यक्रमात कलातपस्वी अप्पा काणेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये बालसाहित्य सेवा पुरस्कार विठ्ठल कदम, कला गौरव पुरस्कार प्रसाद राणे, समाजभूषण पुरस्कार संजय आंग्रे, साहित्य वैभव पुरस्कार गौरव खतकल्ले यांना प्रदान करण्यात आला. तसेच कै. सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार आदर्श शिक्षिका विधी मुद्राळे, उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार स्वाती पाटील यांना देण्यात आला. याशिवाय सद्भावना सत्काराने सुधीर राणे, उदय दुधवडकर, लोकसंगीत सेवा क्षेत्रातील संदीप परब (बुवा) यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी लेखक प्रकाश केसरकर, मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, कार्याध्यक्ष प्रशांत काणेकर, प्रसिद्धीप्रमुख निकेत पावसकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर यांनी केले. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दर्शना पाताडे यांनी आभार मानले.

