सर्वोदय छात्रालयाचा छात्रमित्र मेळावा
सर्वोदय छात्रालयाचा
छात्रमित्र मेळावा
रत्नागिरीः श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट संचलित सर्वोदय छात्रालयाचा २१वा छात्रमित्र मेळावा रविवारी (ता. २८) आयोजित केला आहे. या मेळाव्यात संस्थेच्यावतीने हरिश्चंद्र गीते पुरस्कृत तिसरा सर्वोदय पुरस्कार गुणवंत माजी छात्र रघुवीर शेलार यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. बा. ना. सावंत रोड येथील सर्वोदय छात्रालयाच्या सभागृहात हा मेळावा सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे. अप्पासाहेब पटवर्धन, बाळासाहेब खेर, मोरोपंत तथा तात्यासाहेब जोशी, शामराव तथा अण्णासाहेब पेजे आदींच्या पुण्याईचा वारसा सर्वोदय छात्रालयाला लाभला आहे. शैक्षणिक जीवनातील, छात्रालयातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, आपले स्नेहबंध मजबूत करण्यासाठी माजी छात्रांनी आवर्जून या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके आणि सर्वोदय छात्रालय समितीचे अध्यक्ष अरूण जाधव व पदाधिकारी, सहकाऱ्यांनी केले आहे.
------
राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी
आराध्या कोळंबेकरची निवड
मंडणगड ः रत्नागिरी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या आराध्या कोळंबेकरचे यश ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांनी केले. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग स्पोर्ट्स अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ३५वी महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर सुवर्णपदक मिळवलेल्या कोळंबेकर हिची निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल अभिनंदन करताना पोलिस निरीक्षक गवारे बोलत होते. ही स्पर्धा कुडाळ येथील वासुदेवानंद हॉलमध्ये २६ ते २८ या कालावधीत होणार आहे. यानिमित्त मंडणगड तालुका तायक्वांदो अॅकॅडमीच्यावतीने भोसले प्लाझा येथे कोळंबेकरचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
------
जाकमाता चषक
धामणी संघाने पटकावला
मंडणगड ः तालुक्यातील ग्रामसेवा विकास मंडळ आतले व जाकमातादेवी क्रिकेट संघ आतले यांच्यावतीने जाकमाता चषक मर्यादित षट्कांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २१ डिसेंबरला मुंबई ओव्हल मैदान येथे झाले. स्पर्धेत एकूण ३२ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर सोमय्या भैरवनाथ क्रिकेट संघ धामणी अ याने जाकमाता चषकावर आपले नाव कोरले. श्री काळभैरव क्रिकेट संघ वेळास याने द्वितीय क्रमांक पटकावला तर पाजपंढरी क्रिकेट संघ तृतीय आणि ज्योती देवी क्रिकेट संघ साखरी यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. वैयक्तिक कामगिरीत उत्कृष्ट फलंदाज म्हणून नितेश कुळे (वेळास), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शुभम घागरूम (धामणी) आणि मालिकावीर म्हणून क्रिश घागरूम (धामणी) यांना गौरवण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

