कुडाळात मंगळवारी 
सभापतींची निवड

कुडाळात मंगळवारी सभापतींची निवड

Published on

कुडाळात मंगळवारी
सभापतींची निवड
कुडाळ ः येथील नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवड प्रक्रियेसाठी मंगळवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित केली आहे. विषय समिती सभापतीची निवड झाल्यानंतर स्थायी समितीही गठित केली जाणार आहे. विषय समिती सभापती पदाची मुदत १० डिसेंबरला संपुष्टात आल्यामुळे ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निवडीसाठी दुपारी १२ ते २० मिनिटे या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे सादर करावयाची असून त्यानंतर दुपारी २ वाजता निवडीसाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे. सध्या नगरपंचायतीतील पक्षीय बलाबल पाहता विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध होणार की प्रत्यक्ष निवडणूक लागणार, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीतील राजकीय हालचालींना वेग आला असून, सत्ताधारी भाजप व शिंदे शिवसेना या पक्षांमध्ये हालचाल सुरू झाली आहे.
....................
नूतन विद्यालयाचे
आज स्नेहसंमेलन
बांदा ः विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या (ता. २७) सायंकाळी ७ वाजता विद्यालयात होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत असणार आहेत. फोंडा (गोवा) नगरपालिकेचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ​यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद कामत, बांदा माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत, इन्सुली सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, माजी सभापती बाळा गावडे, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, विद्या विकास मंडळाचे माजी अध्यक्ष कृष्णाजी कोठावळे, माजी अध्यक्ष उमेश पेडणेकर आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ​विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करण्यासाठी पालकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापिका सुविद्या केरकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख विशाखा पालव, शालेय मुख्यमंत्री वैष्णवी सांगेलकर, सांस्कृतिकमंत्री तनिष पालव यांनी केले आहे.
...................
कुडाळात सोमवारी
अग्रणी बॅंकेचे शिबिर
कुडाळ ः ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत बँकांमधील दावा न केलेल्या ठेवी निकाली काढण्याकरिता सोमवारी (ता. २९) सकाळी ११ वाजता विशेष जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन महालक्ष्मी मंगल कार्यालय गुलमोहर हॉटेल नजीक, कुडाळ येथे जिल्हा अग्रणी बँकेतर्फे करण्यात आले आहे. या शिबिरात खातेदारांच्या दावा न केलेल्या ठेवी खातेदार किंवा खातेदार मृत असल्यास त्यांचा वारसाना परत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बँका या शिबिरात सहभागी होणार आहेत. ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत सर्व नामनिर्देशित पात्र लाभर्थ्यांनी या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक (सिंधुदुर्ग) ऋषिकेश गावडे यांनी केले आहे.
......................
कुडाळ येथे उद्या
पेन्शनरांचा मेळावा
कुडाळ ः देशातील सर्व पेन्शनर्स संघटना १७ डिसेंबर हा दिवस ‘पेन्शनर डे’ म्हणून साजरा करतात. या दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पेन्शनर्स असोसिएशन, कुडाळने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद सेवानिवृत्तांचा मेळावा रविवारी (ता. २८) सकाळी १०.३० वाजता मराठा हॉल (कुडाळ हायस्कूल नजिक) कुडाळ येथे आयोजित केला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पेन्शनर्स बंधू व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शरद कांबळी, सरचिटणीस उदय कुडाळकर यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com