स्त्रीवाद पाश्चात्त्य नव्हे; भारतातीलच संकल्पना
13957
13958
स्त्रीवाद संकल्पना भारतातीलच
प्रा. डॉ. राही श्रुती गणेश ः सिंधुदुर्गनगरीत जिल्हास्तरीय महिला परिषद
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः स्त्रीवाद ही पाश्चात्त्य संकल्पना नसून ती भारतीय समाजाच्या मातीत रुजलेली आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. राही श्रुती गणेश यांनी केले. भारतीय स्त्रीमुक्ती दिनानिमित्त दि बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय महिला परिषदेत त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. ही परिषद सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनात झाली.
परिषदेचे उद्घाटन फेडरेशनचे अध्यक्ष शामसुंदर जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे व पोलिस निरीक्षक शेखर लव्हे हे विशेष अतिथी म्हणून तसेच मिनल वानखेडे-मुंबई, फेडरेशनचे कार्याध्यक्ष समाजभुषण संदीप कदम, उपाध्यक्ष पर्णवी जाधव, सचिव अंकुश कदम, सदस्य आनंद धामापूरकर, मधुकर तळवणेकर, संजय कदम, अभय पावसकर, डी. के. पडेलकर, विजय वरेरकर, माजी उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, पत्रकार मोहन जाधव, शारदा कांबळे, गोव्याहून मल्लिका माटे, मुंबईहून सत्यजित तांबे, स्थानिक कार्यकर्ते प्रवीण कदम, विजय जाधव, रश्मी पडेलकर, अर्पिता साळुंखे, सरपंच पी. के. चौकेकर, प्रमोद कासले उपस्थित होते.
बौद्ध धम्म सेवा संघ व रानबांबुळी महिला मंडळाच्या कलावंतांनी वंदन गीत व धम्मगीत सादर केले. कार्याध्यक्ष संदीप कदम यांनी जिल्ह्यातील सर्व बौद्ध संघटनांना एका झेंड्याखाली आणण्याचे फेडरेशनचे उद्दिष्ट स्पष्ट केले. महाबोधी महाविहारासाठी आयोजित मोर्चा, कणकवलीतील धम्म परिषद यानंतर ही महिला परिषद पुढचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांमध्ये संवाद, नेतृत्वगुणांचा विकास व संघटनात्मक एकजूट घडवणे हा या परिषदेचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटन सत्रानंतर ‘भारतीय स्त्रीमुक्ती आंदोलनाची क्रांतिकारी परंपरा आणि संविधान’ विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्त्या रश्मी पडेलकर यांनी भूषविले. प्रा. डॉ. राही श्रुती गणेश यांनी आपल्या मार्गदर्शनात, सामाजिक उतरंडीमुळे खालच्या स्तरातील घटकांवर अन्यायकारक वागणूक होते. जातिव्यवस्था व पितृसत्ताक व्यवस्था यांमुळे शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रियांवर शोषण झाले. त्यामुळे या व्यवस्थांना विरोध करणे अपरिहार्य आहे. इतिहासाचे सम्यक आकलन करून न्याय्य भविष्य घडवण्यासाठी धोरणे आखली पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले.
प्रा. मीनल वानखेडे (मुंबई) यांनी तथागत गौतम बुद्धांनी भिक्कुनी संघाची स्थापना करून स्त्री-पुरुष समानतेचा पाया घातल्याचे सांगितले. सध्याच्या राजकारणात स्त्रियांचे प्रतिनिधित्व नगण्य असून त्यांनी पुढाकार घेऊन ५० टक्के प्रतिनिधित्व मिळवावे, असे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे स्त्रियांसाठी मुक्तीची दारे खुली केली असून ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या त्रिसूत्रीवर आधारित चळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिशादर्शक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तिसऱ्या सत्रात अश्वघोष सांस्कृतिक कला मंच, पावशी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
--
महिलांनी मांडले विचार
खुल्या चर्चेत ‘समतेच्या लढाईत स्त्रियांची भूमिका : काल, आज आणि उद्या’ या विषयावर देवगड, वैभववाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले आदी तालुक्यांतील नेतृत्वशील महिलांनी विचार मांडले. शर्वरी कदम व नेत्रा कदम यांनी कविता वाचन केले, तर पंचशील महिला मंडळ, सिद्धार्थ नगर मिठमुंबरी यांनी भीमगीत सादर केले. समारोप सत्रात सचिव अंकुश कदम यांनी ठराव वाचन केले. अर्पिता साळुंखे यांनी आभार मानले.

