रत्नागिरी- एन.एस.एस. शिबिराचे फणसोपला उद्घाटन

रत्नागिरी- एन.एस.एस. शिबिराचे फणसोपला उद्घाटन

Published on

rat28p1.jpg-
13959
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या एन.एस.एस. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना धनेश रायकर. सोबत राधिका साळवी, प्रा. मधुरा पाटील, श्रीराम भावे, विनायक हातखंबकर आदी.
------------

देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या
एनएसएस शिबिराचे फणसोपला उद्घाटन
रत्नागिरी, ता. २८ : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबिर फणसोप येथे सुरू झाले. त्याचे उद्घाटन फणसोपच्या सरपंच राधिका साळवी यांच्या हस्ते झाले.
या वेळी पोलिसपाटील कीर्ती साळवी, भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर, विश्वस्त विनायक हातखंबकर, प्र. प्राचार्या मधुरा पाटील उपस्थित होते. सरपंच साळवी यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि शिबिरासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर आणि विश्वस्त विनायक हातखंबकर यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. मिथिला वाडेकर, सह कार्यक्रमाधिकारी प्रा. ऋतुजा भोवड व प्रा. विनय कलमकर यांनी स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले.
शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण विकासाची ओढ निर्माण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रा. मिथिला वाडेकर यांनी सांगितल. अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अशा शिबिरांचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी शिबिरातील विविध उपक्रमांची, राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांची आणि श्रमदानाच्या कामाची सविस्तर पाहणी केली.
डॉ. मराठे म्हणाले, एनएसएस हे केवळ श्रमदानाचे माध्यम नसून ते चारित्र्य निर्मितीचे आणि समाज समजून घेण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. शिबिरातील शिस्त, कष्ट आणि सहकार्य यातूनच एक उत्तम नागरिक घडतो.

चौकट १
व्यक्तिमत्त्व विकास
शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत नवनिर्माण महाविद्यालयाचे प्राध्यापक सुशील साळवी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या खेळांच्या माध्यमांतून व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंची ओळख स्वयंसेवकांना करून दिली. सर्व स्वयंसेवकांनी या सत्रामध्ये उत्फूर्तपणे सहभाग घेतला. चंदना डोर्लेकर हिने सूत्रसंचालन केले. सेजल सनगरे हिने आभार मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com