लोहमार्ग पोलिस ठाण्यामुळे गुन्हेगारीला चाप

लोहमार्ग पोलिस ठाण्यामुळे गुन्हेगारीला चाप

Published on

द बिग स्टोरी...लोगो

rat28p5.jpg
13963
रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाणे
rat28p6.jpg
13964
रत्नागिरी रेल्वे स्थानक
rat28p7.jpg
13965
रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेत चोऱ्या करणारी आंतराज्यीय टोळी पकडली. यावेळी आरोपी, मुद्देमालासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वर्ग.
rat28p8.jpg-
13966
कोकण रेल्वे
--------------

इंट्रो...

कोकण रेल्वेमुळे दळणवळणामध्ये मोठी क्रांती झाली. दिल्ली, मुंबई, अगदी कर्नाटक, अशी मोठी शहरे जवळ आली. दळणवळणाचा कोकणवासीयांना मोठा पर्याय निर्माण झाला; परंतु या कोकण रेल्वेच्या माध्यमातून गुन्हेगारीदेखील कोकणाला जवळ आली. कोकण रेल्वेमध्ये महिलांची छेडछाड, चोऱ्या, जागेवरून मारहाणीच्या घटना घडतात; परंतु या हद्दीत लोहमार्ग पोलिस नसल्याने रेल्वेसुरक्षा दलाशी संपर्क साधून याबाबतचा कारवाई करावी लागत होती; परंतु तक्रार देताना रेल्वेसुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्याचे काम करावे लागत होते. यामुळे या गुन्ह्यांचा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांवर मोठा ताण होता; परंतु आता शासनाने कोकणातील रोहा, कणकवली आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी स्वतंत्र लोहमार्ग पोलिस ठाणी मंजूर केली आहे. रत्नागिरी येथे स्वतंत्र लोहमार्ग पोलिस ठाणे सुरू झाले आणि कोकण रेल्वे प्रवाशांची सुरक्षा मजबूत झाली. गेल्या चार महिन्यांमध्ये आंतरराज्यीय टोळ्यांचा पर्दाफाश लोहमार्ग पोलिसांनी केला. त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली आहे. लोहमार्ग पोलिसाच्या एन्ट्रीने रेल्वेमधील चोरट्यांना चाप बसण्यास मदत होत आहे, तसेच जिल्हा पोलिसांचा ताणही कमी झाला आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांना अधिक मनुष्यबळ व सुविधा देऊन त्यांनी बळकट करण्याची गरज आहे.
- राजेश शेळके, रत्नागिरी
-------------------

गुन्हेगार नव्हे, कायदा धावतो!
लोहमार्ग पोलिस ठाण्यामुळे चाप; आंतरराज्यीय टोळ्यांचा पर्दाफाश; अधिक मनुष्यबळ, सुविधांनी मिळेल बळकटी

कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी कोकणातील रोहा, कणकवली आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी लोहमार्ग पोलिस ठाणी प्रस्तावित होती. त्यातील रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलिस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली. त्यासाठी ९१ लाख ७० हजाराचा निधी मंजूर केला असून, १५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती केली आहे. चार महिन्यांपूर्वी हे पोलिस ठाणे रत्नागिरीत सुरू झाले. रेल्वेतील गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास करण्यासाठी नवी यंत्रणा निर्माण झाल्यामुळे चोरट्यांना धडकी भरली आहे. गेल्या दोन महिन्यात महत्त्वाचे मोठे गुन्हे या पोलिसांनी उघड केले आहेत. आंतरराज्यीय टोळ्याच पोलिसांच्या हाती लागल्यामुळे गुन्हेगारीला लगाम बसण्यास मदत होत आहे. कोकण रेल्वेतील प्रवाशांना आता सुरक्षित प्रवासाबाबत भरोसा निर्माण होताना दिसत आहे.
-------

रेल्वे सुरक्षा दलाकडे होती सुरक्षा

शासनाच्या गृहविभागाने याबाबतचा अध्यादेश जारी केला. त्यामुळे कोकण रेल्वेची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील स्थानके, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्वेसुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अखत्यारित आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द सीएसएमटी ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकी हीलपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. या हद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वेसुरक्षा दलावर आहे.
-----------

...म्हणून तीन लोहमार्ग पोलिस ठाण्याचे प्रस्ताव

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडीत कोकण रेल्वे स्थानकांदरम्यान एखादा गुन्हा घडल्यानंतरही त्याबाबतची तक्रार प्रवासी मुंबईत आल्यानंतर करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. कोकण रेल्वेच्या हद्दीतून प्रवास करताना लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिलांची छेडछाड, विनयभंग किंवा अन्य मारहाणीच्या तक्रारी येतात; मात्र या हद्दीत लोहमार्ग पोलिस नसल्याने रेल्वेसुरक्षा दलाशी संपर्क साधून कारवाई करावी लागत होती. आपल्या हद्दीतील स्थानके तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलिस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली आणि रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाणे सुरू झाले.
------------

अशा होत होत्या चोऱ्या

कोकण रेल्वेतील चोरटे गाड्यांच्या क्रॉंसिंगची पूर्ण माहिती घेत होते. रेकी करून आणि गाड्याच्या वेळा बघून हे चोरटे चोऱ्या करतात. विशेषतः कोकण रेल्वेमार्गावरील क्रॉसिंगजवळ गाडी अंधारात थांबते. त्याचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरल्या जातात. चोरटे झोपलेल्या प्रवाशांचा पर्स, बॅगा, मोबाईल चोरतात तसेच अंधारामध्ये गाडी क्रॉसिंगला थांबली की, हे चोरटे सहकाऱ्याच्या खांद्यावर बसून खिडकीजवळील प्रवाशांच्या गळ्यातील दागिने, मोबाईल, पर्स आदी चोरतात. ऑगस्ट २०२५ पासून या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते.
-----------

म्हणून चोरटे वापरत नव्हते मोबाईल

पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून चोरटे मोबाईल वापरत नव्हते. त्यामुळे त्यांचे लोकेशन मिळवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. चोरट्यांचा शोध घेताना पोलिसांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. टीम पंधरा दिवस त्यांच्या मागावर होती तेव्हा त्यातील एक सापडला आणि आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला. इतर साथीदारांना याची कुणकूण लागताच ते फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. रेल्वेहद्दीवर अधिक लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
--------

लोहमार्ग पोलिसांची चतुराई

रेल्वेतील वाढत्या चोऱ्यांचा विचार करून नव्याने झालेल्या रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांनी यावर अभ्यास केला. या मार्गावर आजवर घडलेल्या गुन्ह्यांची एकत्रित माहिती गोळा केली. चोरट्यांची चोरीची पद्धत काय, याचा यावर विचार केला. तेव्हा यामध्ये काही सीसीटीव्ही फूटेज प्राप्त झाले. त्याचा आधार घेऊन तांत्रिक तपासामध्ये अहिल्यानगर येथे चोरट्यांचा माग काढून एका संशयिताला अटक केली. विनोद जाधव असे त्याचे नाव आहे.
----------

आंतरराज्यीय टोळीचा झाला पर्दाफाश

रत्नागिरी लोहमार्ग पोलिस हद्दीत ऑगस्टपासून रेल्वेक्रॉसिंगवर गाडी थांबलेल्याचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. त्यापैकी एकाला अहिल्यानगर येथून अटक केली आहे. त्याच्याकडून अन्य तिघांची नावे निष्पन्न झाली असून, ते फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून ८ गुन्हे उघडकीस झाले असून, त्यातील ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
--------------

चुकलेल्या, घरातून निघून आलेल्या बालकांना आधार

कोकण रेल्वे मार्गावर काही मुले चुकतात किंवा काही मुलं पळून येतात. यामध्ये परप्रांतीय मुलांचाही समावेश असतो. या मुलांना रेल्वे सुरक्षा दल चाइल्ड लाइन संस्थेकडे पाठवत असत. त्यानंतर संस्था त्या मुलांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करायची. परंतु रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाणे झाल्यामुळे अशी मुलं या पोलिस ठाण्यात येतात. या ठाण्याच्या महिला पोलिस मुलांसाठी अत्यंत मायेने आणि प्रेमाने सांभाळ करत त्यांच्याकडून माहिती घेतात आणि कुटुंबाशी संपर्क साधुन त्यांच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात. कुटुंबापासून दुरावलेल्या अशा मुलांना पुन्हा कुटुंबाच्या स्वाधीन करण्याचे उत्तम काम या ठाण्याच्या महिला पोलिस करत आहेत. त्यामुळे चुकलेल्या मुलांना आणि पालकांना याचा मोठा आधार मिळत आहे.
----------
उघडकीस आणलेले गुन्हे

रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाणे (लोहमार्ग मुंबई) यांनी अटक केलेल्या संशयित चोरट्यांकडून ८ गुन्हे उघड केले. पहिल्या गुन्ह्यात ६० हजार किमतीचे ५.०७ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, दुसऱ्या गुन्ह्यात १ लाख ८० हजार किमतीची एक १५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, तिसऱ्या गुन्ह्यात १ लाख २० हजार किमतीची ९.९३ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, चौथ्या गुन्ह्यात ८२ हजार रुपये किमतीची ६.८५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, पाचव्या गुन्ह्यात ६० हजार किमतीची ५.१३ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, सहाव्या, सातव्या आणि आठव्या गुन्ह्यातही महिलेची पर्स त्यामध्ये पॅनकार्ड, आधार कार्ड व इतर किरकोळ साहित्य मिळाले आहे, असा एकूण ५ लाख २ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

कोट
कोकण रेल्वेमार्गावर होणाऱ्या चोऱ्यांबाबत तांत्रिक तपास केला आणि त्यादृष्टीने तपासाला दिशा दिल्यानंतर आंतरराज्य टोळी उघड झाली. रेल्वेची हद्द मोठी असून, आमच्याकडे असलेले उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे आता पुरेसे मनुष्यबळ मिळावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. प्रवाशांनी देखील रेल्वेप्रवास करताना सजक आणि सतर्क राहिले पाहिजे. आपल्या सामानावर लक्ष ठेवले पाहिजे.
- निलिमा कुलकर्णी, लोहमार्ग पोलिस सहाय्यक पोलिस आयुक्त

कोलाड ते राजापूर अशी सुमारे २६५ किमीची रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांची हद्द आहे. यापूर्वी रेल्वेमध्ये घडणारे गुन्हे त्या त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल केले जात होते; परंतु आता रेल्वेतील गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र लोहमार्ग पोलिस स्थापन झाले आहे; परंतु होम सिग्नलच्या बाहेरचे गुन्हे अजूनही त्या त्या पोलिस ठाण्यात दाखल होतात; मात्र लोहमार्ग पोलिस ठाण्यामुळे रेल्वेतील गुन्हेगारी कमी झाली आहे. रात्री-अपरात्री रेल्वेस्थानकात रेल्वे पोलिस असल्याने प्रवाशांना आधार मिळून सुरक्षित वाटते. प्रवाशांना सुरक्षितता देणे हेच आमचे काम आहे.
- प्रवीण पाडवी, पोलिस निरीक्षक, लोहमार्ग पोलिस, रत्नागिरी

रेल्वेमध्ये झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याला प्रचंड मर्यादा येत होती. त्यामुळे हे गुन्हे उघडकीस आणण्यात मोठी अडचण येत होती. महिन्याला साधारण ५ ते ७ गुन्हे दाखल होत होते. काही गुन्हे तर निजामुद्दिनला पोहचल्यानंतर महिन्या दीड महिन्यांनी देखील दाखल झाले आहेत; परंतु लोहमार्ग पोलिस ठाणे झाल्यामुळे रेल्वेतील गुन्ह्यांचाच तपास केला जात आहे. त्यामुळे गुन्हे उघड होण्याचे प्रमाणही वाढले आहे आणि आमचा ताणदेखील कमी झाला आहे.
- विवेक पाटील, पोलिस निरीक्षक, रत्नागिरी शहर

कोकण रेल्वेमार्गावर घडणाऱ्या चोऱ्या, मारामारी आदी गुन्ह्यांचा आमच्यावर ताण होता. इतर गुन्ह्यांबरोबर रेल्वेतील गुन्ह्यांचा तपास करावा लागत होता. वर्षाला साधारण आठ ते दहाच्यावर गुन्हे घडत होते. आता या गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाणे सुरू झाले आहे. त्यामुळे आमच्यावरील ताण कमी झाला आहे.
- राजेंद्र यादव, निरीक्षक, ग्रामीण पोलिस ठाणे
---------------------
एक नजर
* रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांची हद्द तब्बल २६५ किमी
* सध्या १ पोलिस निरीक्षक, ५ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, ५९ अंमलदार आणि १८० होमगार्ड
* रेल्वेच्या २७ स्थानकांवर सध्या पोलिस बंदोबस्त
* २५ ऑगस्ट २०२५ पासून आजपर्यंत ५३ गुन्हे दाखल

Marathi News Esakal
www.esakal.com