पावस-स्वप्नांच्या मागे चिकाटीने धावा
rat28p10.jpg-
O13977
रत्नागिरी ः सर्वांनी आनंदी आणि आरोग्यदायी राहण्याचा संदेश गाण्यातून देताना नवनिर्माण हायचे विद्यार्थी.
----------
स्वप्नांच्या मागे चिकाटीने धावा
कमांडंट अमित ध्यांनी; नवनिर्माण हायमध्ये ‘स्पेस लॅब’ची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २८ः भारताच्या प्रगतीमध्ये तरुण पिढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे आहे. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच स्वयंशिस्त, मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगिकारावा. अपयशाने खचून न जाता स्वप्नांच्या मागे चिकाटीने धावण्याचा संदेश इंडियन कोस्ट गार्डचे कमांडंट अमित ध्यानी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
रत्नागिरी येथील नवनिर्माण हाय स्कूल आयोजित ‘सांस्कृतिक २०२५’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही, वातावरणात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. महत्त्वाच्या राष्ट्रीय व सामाजिक घटनांचे प्रभावी कलात्मक सादरीकरण हे या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन इंडियन कोस्ट गार्डचे कमांडंट अमित ध्यानी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. अलिमियॉं परकार, चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, मुख्याध्यापक उल्हास सप्रे, पक्षी निरीक्षक तेजा मुळे, लेखिका शर्मिला पटवर्धन उपस्थित होते.
चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी इस्रोच्या सहकार्याने ‘स्पेस लॅब’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटन कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थिनी अफ्रा डिंगणकर हिने लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर ‘वंदे मातरम्’ या नृत्याने झाली. त्यानंतर भक्तिगीते, नृत्यप्रयोग आणि नाट्य सादरीकरणांनी कार्यक्रमात रंगत आणली. सन २०२५ मधील अहमदाबाद विमान दुर्घटना, भारतीय महिला संघाने पटकावलेला विश्वचषक, ऑपरेशन सिंदूर तसेच भारतीय हॉकी संघाच्या यशस्वी कामगिरीचे प्रभावी चित्रण विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून साकारले. विमान दुर्घटना व ऑपरेशन सिंदूरच्या सादरीकरणावेळी अनेक पालक व विद्यार्थी भावूक झाले.
चौकट
सामाजिक विषयांवरील जागृती प्रभावी
राजस्थानी व पंजाबी लोकनृत्यांच्या नेत्रदीपक सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या अजरामर संवादांनी सजवलेल्या ‘दिलखेचक’ नृत्याद्वारे त्यांना मानवंदना देण्यात आली. स्नेहसंमेलनात आत्महत्या प्रतिबंध, स्त्री शिक्षण, ऑटिझम, गरीब-श्रीमंत दरी यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर प्रभावी जनजागृती करण्यात आली. रामायण आणि ‘सावित्री तू शिक’ या नाटिकांनी विशेष लक्ष वेधले.

