कुडाळ येथे आजपासून रोटरी महोत्सव

कुडाळ येथे आजपासून रोटरी महोत्सव

Published on

13990

कुडाळ येथे आजपासून
रोटरी क्लबतर्फे महोत्सव

कुडाळ, ता. २८ ः येथील रोटरी क्लब महोत्सवाचे उद्या (ता. २९) सायंकाळी ७ वाजता येथील हायस्कूल मैदानावर उद्‌घाटन होणार आहे. आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ होईल. मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आली असून, नामवंत कलाकारांची उपस्थिती महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
येथील रोटरी क्लब दर दोन वर्षांनी सरत्या वर्षाला निरोप व नववर्ष स्वागतासाठी रोटरी फेस्टिवल आयोजित करत असतो. यावर्षी हा महोत्सव २९, ३० व ३१ ला येथील हायस्कूल मैदानावर होणार आहे. महोत्सवात इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो अंतर्गत नामांकित कंपन्यांचे तब्बल ८९ स्टॉल्स सहभागी होत असून, सिंधुदुर्गवासीयांना खरेदी व माहितीची मोठी पर्वणी लाभणार आहे. उद्‍घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, ‘पीडीजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०’ संग्राम पाटील, प्रणय तेली, डॉ. प्रशांत कोलते, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, असिस्टंट गव्हर्नर विनया बाड उपस्थित राहणार आहेत.
२९ च्या ‘नृत्य, हास्य, सुरांचा संगम’ या कार्यक्रमात ‘सूर नवा-ध्यास नवा’ फेम गायक निखिल मधाळे, ‘झी युवा सिंगर’फेम ब्रह्मानंदा पाटणकर, गायक हर्षद मेस्त्री, तसेच विनोदाचा बादशहा दिव्येश शिरवडकर प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. याच दिवशी ५ ते ११ व १२ ते १६ वयोगटातील मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार असून, स्पर्धक संख्या ३० पर्यंत मर्यादित ठेवली आहे. आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. ३० ला ६५ कलाकारांचा सहभाग असलेला साई कला मंच निर्मित ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ आयोजित मोड आलेल्या कडधान्यांवर आधारित पाककला स्पर्धाही होईल. ३१ ला साई जळवी फिल्म प्रस्तुत अफलातून मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात सुपरस्टार संतोष जुवेकर, ‘तू आभाळ’ फेम पार्श्वगायक रवींद्र खोमणे, महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त गायिका अमिता घुगरी, कोकणचा महागायक सागर कुडाळकर, अभिनेत्री-नृत्यांगना नूपुर जोशी, निवेदक किरण खोत सहभागी होणार आहेत. रोज लकी ड्रॉ सोडत होणार आहे. ३१ ला महाभाग्यवान विजेत्यास आकर्षक सायकल, तसेच इन्स्पायर सायकल पुरस्कृत दोन विजेत्यांना सायकली देण्यात येणार आहेत. महोत्सवात चारचाकी, दुचाकी ऑटो एक्स्पो सर्वांसाठी खुले आहे. २९ व ३१ ला बांदा येथील ‘अलाईव्ह स्टॅच्यू’ ग्रुपचे कलाकार खास आकर्षण ठरेल. स्थानिक कलाकारांचे ग्रुप डान्स सादरीकरणही होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार, सचिव मकरंद नाईक, रोटरी सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष अॅड. राजीव बिले व कार्यक्रम प्रमुख सचिन मदने यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com