

रोपवाटिका महासंघाच्या
अध्यक्षपदी हेमंत तांबे
सावर्डेत बैठक ; सल्लागारपदी आमदार शेखर निकम
पावस, ता. २८ ः चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्या कार्यालयात झालेल्या रत्नागिरी जिल्हा परवानाधारक रोपवाटिका महासंघाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आमदार निकम यांची महासंघाच्या प्रमुख सल्लागारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच देवरूखचे हेमंत तांबे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, कोकण चळवळीतील कार्यकर्ता व कृषी क्षेत्रातील युवा नेतृत्व अॅड. ज्ञानेश पोतकर यांच्यावर सल्लागार आणि उपाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आमदार निकम हे स्वतः शेतकरी व एमएससी हॉर्टिकल्चर शिक्षण घेतलेले लोकप्रतिनिधी असून, कोकण व राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ महासंघाला होणार आहे. अॅड. पोतकर हे कोकण चळवळ, कृषी व कृषी पर्यटन क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून, शेतकऱ्यांच्या समस्या अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्याची त्यांची ओळख आहे. कृषिपंप वीजबिल माफीसाठी त्यांनी शासन आयोगापुढे केलेली प्रभावी मांडणी विशेष उल्लेखनीय ठरली आहे. कोकणातील शेतकरी, कृषी व पर्यटनविषयक अनेक मसुदे त्यांनी लोकप्रतिनिधींमार्फत विधीमंडळात पोहोचवले आहेत.