गावतळे-यशापयश पचवण्याची क्षमता विकसित करा
यशापयश पचवण्याची
क्षमता विकसित करा
रामचंद्र सांगडे ; हिवाळी क्रीडास्पर्धा समारोप
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. २९ ः यश आणि अपयश दोन्ही पचवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली पाहिजे, असे प्रतिपादन दापोलीचे गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी केले.
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हिवाळी क्रीडास्पर्धेच्या समारोपावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, यश मिळाल्याने हुरळून जाऊ नये आणि पराभवामुळे खचून जाऊ नये तर पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करावेत. खेळामुळे मन, मेंदू आणि मनगट सक्षम होत असते. या कार्यक्रमावेळी विस्ताराधिकारी बळीराम राठोड, मेघा पवार, सुधाकर गायकवाड, केंद्रप्रमुख धनंजय सिरसाट, सुनील कारखेले, संजय जंगम, गुलाबराव गावीत, दीपाली जुवेकर, दिलीप जाधव तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत तालुक्यातील गावतळे, उंबर्ले, दापोली, करंजाणी, पालगड व आंजर्ले या सहा प्रभागांतून आलेल्या निवडक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धांद्वारे सांघिक व वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्ये दापोली तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना सदाशिव रसाळ व अंकुश गोफणे यांच्या सौजन्याने प्रशस्तीपत्रे व ट्रॉफीज प्रदान करण्यात आल्या.

