बालदिनानिमित्त दमामे येथे स्पर्धा
बालदिनानिमित्त
दमामे येथे स्पर्धा
गावतळेः श्री धाराई जाखमाता विकास मंडळ, सहसुविधा महिला मंडळ व संयुक्त युवक मंडळ यांच्यावतीने २० डिसेंबरला शालेयअंतर्गत चित्रकला, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा तसेच वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मोठ्या उत्साहात झाला. या स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपली कला, बुद्धिमत्ता व आत्मविश्वास सादर केला. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या अभावामुळे शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढत असताना, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत गोडी निर्माण होऊन नवचैतन्य येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतच अशा उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा संकल्प मंडळाच्या युवकांनी प्रत्यक्षात उतरवला असून, हा उपक्रम समाजोपयोगी ठरत आहे. कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक पिटले, मुख्याध्यापिका निलीमा धोपावकर आदींनी सहकार्य केले.
-----------------
जोशी हायस्कूलमध्ये
वाजपेयी यांची जयंती
गावतळे ः दापोली तालुक्यातील करजगाव येथील व्ही. के. जोशी हायस्कूल येथे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची १०१वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक एस. आर. जोशी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मुख्याध्यापक जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अटलबिहारी वाजपेयी यांचे नेतृत्वगुण, देशभक्ती, प्रामाणिकपणा, लोकशाही मुल्यांची जपणूक या विषयी सविस्तर माहिती दिली .
--------
देगाव सोसायटीच्या
अध्यक्षपदी गोलांबडे
गावतळे ः दापोली तालुक्यातील देगाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी प्रभाकर गोलांबडे तर उपाध्यक्षपदी संजय रामाणे यांची निवड करण्यात आली. सचिव प्रवीण कानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश कदम, बाळकृष्ण बारे, संदीप गोलांबडे, दत्ताराम बारे, मोहन डिगनकर, राजाराम मोरे, चेतन गोलांबडे, अनुराधा भोसले, संजय जाधव, श्याम गायकर यांची संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. वेदा मयेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
-------

