निवृत्त शिक्षकांतर्फे भोसलेंचा सत्कार
14250
निवृत्त शिक्षकांतर्फे भोसलेंचा सत्कार
सावंतवाडी ः पालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांचा महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर व अधिकारी कर्मचारी संघटना सावंतवाडी शाखेच्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी. बी. चव्हाण व तालुकाध्यक्ष लवू चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना, सावंतवाडी पालिकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांकडे नगराध्यक्षांचे लक्ष वेधले. हे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आली. यावर नगराध्यक्ष भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संघटनेने सविस्तर लेखी पत्र सादर करावे, त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाला लखमराजे भोसले यांच्यासह संघटनेचे उपाध्यक्ष संभाजी कांबळे, कार्याध्यक्ष वसुंधरा चव्हाण, सल्लागार चंद्रकांत आकेरकर, सदस्य दत्ताराम म्हापणकर, विजय ओटवणेकर, सदानंद सांगेलकर आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष वसुंधरा चव्हाण यांनी आभार मानले.
...................
14251
‘बांगलादेशातील हिंदूंचा छळ थांबवा’
दोडामार्ग : बांगला देशात हिंदूंवरील वाढते अत्याचार, हत्या व धार्मिक छळ थांबवण्यासाठी तत्काळ राजनैतिक हस्तक्षेप व आंतरराष्ट्रीय दबाव यावा, तसेच बांगला देशातील हिंदूंना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी तालुक्यातील हिंदू बांधवांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देण्यासाठी दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. श्री. गुरव यांनी निवेदन स्वीकारून ते पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पोहोचविण्याची ग्वाही दिली.

