गुहागर ः थर्टीफर्स्ट पूर्वीच गुहागरात पर्यटकांची तुफान गर्दी

गुहागर ः थर्टीफर्स्ट पूर्वीच गुहागरात पर्यटकांची तुफान गर्दी

Published on

१४२०४

थर्टी फर्स्टपूर्वीच गुहागरात जल्लोष
कोटीपर्यंत उलाढाल शक्य ः पर्यटक देताहेत किनाऱ्यांना पसंती
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २९ : कोकणचे नव्हे, तर राज्याचे पर्यटन केंद्रबिंदू म्हणून पुढे येत असलेल्या गुहागरमध्ये नववर्ष स्वागतापूर्वी दोन दिवस आधीच पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे, दापोलीतील आंजर्ले, हर्णै, कर्दे येथील समुद्र किनारीही पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल, लॉज, घरगुती निवास व्यवस्था येथे पर्यटकांचा राबता अधिक झालेला आहे. पुढील आठ दिवस पर्यटकांनी किनारे फुल्ल राहतील, असा हॉटेल व्यावसायिकांचा अंदाज आहे. २०२५ च्या सरत्या वर्षाला कोटीच्या घरात उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र आणि शांत किनारा म्हणून गुहागरची ओळख आहे. वाशिष्ठी नदी आणि जयगडच्या खाडीजवळ गुहागर वसलेले आहे. अथांग सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे गुहागरचे प्रमुख आकर्षण आहे. गुहागर समुद्रकिनारा सात किलोमीटर लांबीचा आहे. गुहागर, पालशेत, अडूर - बुधल, बोऱ्याबंदर, हेदवी, वेळणेश्वर, रोहिले, तवसाळ हे गुहागरमधील समुद्रकिनारे आहेत. यापैकी बहुतांश समुद्रकिनारे पर्यटकांपासून अलिप्त आहेत. त्यामुळे पर्यटकांची फारशी गर्दी नसते. इथल्या शांत, निवांत समुद्रकिनाऱ्यावर फिरताना लाटांचा आवाज कानात घुमतो. इथलं निसर्गसौंदर्य पाहून मन हरखून जाते. समुद्रकिनाऱ्यांसह गुहागरमध्ये नैसर्गिक चमत्कारदेखील पाहायला मिळतात. हेदवी समुद्रकिनाऱ्यावर वर्षानुवर्षे समुद्राच्या लाटांचा मारा होऊन येथील खडकावर एक मोठी अरुंद भेग (घळ) निर्माण झाली आहे. भरतीच्यावेळी समुद्राचे पाणी या घळईत जोराने घुसते. यानंतर या घळईतून एखाद्या कारंज्याप्रमाणे पाणी वेगाने वर उसळते. ही घळ ‘बामणघळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही सर्व ठिकाणे गर्दीने फुलून गेली आहेत. भगवान शंकरांचे वास्तव्यस्थान ‘गुह्यवन’ म्हणून गुहागर ओळखले जाते. दगडी बांधणीचे व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत आहे. दशभूज गणेशाचे मंदिर, वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिर, वेळणेश्वरचे श्री देव वेळणेश्वर मंदिरदेखील तितकेच लोकप्रिय आहे. तालुक्यात पर्यटन हंगामात दिवसाला सुमारे १६०० ते १८०० पर्यटक येत असतात. यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला गेल्या काही वर्षांत सुगीचे दिवस आले आहेत. यावर्षी त्याची पुनरावृत्ती झाली आहे.
दरम्यान, गुहागर तालुक्यात सुमारे ७० हॉटेल, ४० एमटीडीसी निवासस्थाने व ८० घरगुती निवास आणि राहण्याची व्यवस्था आहे. गेल्या काही वर्षांत असगोली किनारी द वूड, हॅपी केबिन, मोडकाआगर येथे शांताई रिसॉर्ट, गुहागर कीर्तनवाडी येथे मँगो व्हीलेज, पालशेत किनारी गाज, गुहागर शहरातील नक्षत्र, श्रीपूजा, चैतन्य निवास अशी चांगली राहण्याची ठिकाणे आधीच फुल्ल झाली आहेत. किनारी खाद्यपदार्थांचे स्टॉल, उंटसफर, घोडासफर, पाण्यामध्ये जेटस्की, बनाना राईडस्‌ व अन्य सफारीचा आनंद लुटत आहेत.

चौकट
रात्री उशिरापर्यंत फेरीबोटींना गर्दी
जिल्ह्यात मुंबई, पुणे, भिवंडी, अकोला, जळगाव यासह परराज्यातील पर्यटकही फिरण्यासाठी आलेले आहेत. गणपतीपुळे मंदिरात दर दिवशी २५ हजारांहून अधिक पर्यटकांची नोंद होत आहे. २५ डिसेंबरपासून हे पर्यटक येत आहेत. पर्यटकांकडून जयगड ते तवसाळ आणि धोपावे ते दाभोळ फेरीबोटीचा उपयोग पर्यटक करीत आहेत. सलग तिन दिवस रात्री उशिरापर्यंत फेरीबोट सेवा सुरू ठेवावी लागत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचाही फायदा होत आहे.

कोट
यंदाचा पर्यटन हंगाम व्यावसायिकांसाठी अच्छे दिन घेऊन आला आहे. समुद्र किनारे हे कोकणची ओळख असून परजिल्ह्यातील पर्यटकांचे ते प्रमुख आकर्षण आहे. त्यामुळे सर्वच किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पर्यटक दिसून येत आहेत. गणपतीपुळेत किनाऱ्याबरोबर श्रींचे मंदिर असल्यामुळे पर्यटकांची संख्या अधिक आहे.
- प्रमोद केळकर, व्यावसायिक, गणपतीपुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com