सदर-....तर दापोलीचे सौदर्य अधिकच बहरेल !
rat30p7.jpg-
14355
डॉ. प्रशांत परांजपे
झळा पर्यटनाला... लोगो
इंट्रो
दापोली अर्थात् मिनी महाबळेश्वरला नवीन वर्षाच्या स्वागताआधी अर्थात् पूर्ण डिसेंबर महिन्यात पर्यटकांनी उत्तम प्रकारची पसंती दिली आहे. लाखो पर्यटकांनी दापोलीच्या नयनरम्य समुद्रकिनारा, थंड हवा आणि विविध कोकणी पदार्थांचा आस्वाद घेतला; मात्र पर्यटकांच्या पसंतीच्या दापोलीमध्ये धुळीची झालर पसरली गेल्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर थोडं विरजण पडलेलं दिसून आलं. या निमित्ताने दापोलीच्या पर्यटनाला नवा साज देण्याची गरज निर्माण झाल्याचे अधोरेखित होत आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का? हा प्रश्नच आहे...!
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
------
....तर दापोलीचं सौंदर्य अधिकच बहरेल !
दापोली तालुक्याचा निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना खड्डे आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. त्या समवेतच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नाहक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई आदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांकडून ऐकायला मिळत आहेत. समुद्रकिनारी शौचालय, चेंजिंग रूम, सुरक्षाव्यवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना अर्थात् विजेची व्यवस्था, संपर्क किंवा माहितीकेंद्रांचा अभाव, पार्किंगच्या असुविधा, वाहतूक नियंत्रणाचा अभाव, किंबहुना गर्दीच्या पर्यटन किनाऱ्यावर कोणतीही वाहने उभी करण्याची स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था नसणे, नेटवर्कचा अभाव आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे भुत भानामतीपेक्षा भूलभुलैय्याच्या गर्तेत अडकून दापोलीपर्यंत पोहोचणे हे एक प्रकारे दिव्यच आहे. दापोलीत आल्यानंतर विविध ठिकाणी फिरण्याकरिता प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो, असे दापोलीला पसंती देऊन जाणाऱ्या पर्यटकांकडून आवर्जून सांगितले जात आहे. या असुविधांमुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी कितीही सुविधा उपलब्ध केल्या असल्या तरीही खड्डे आणि धुळीच्या झालरीमुळे आणि असुविधांच्या गर्तेमुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजणच पडते.
दापोलीला महामार्गावरून येणाऱ्या सर्व मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच आहे. दापोलीला पोहोचेपर्यंत संपूर्ण दिवसच वाया गेला, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. दापोलीला मिनी महाबळेश्वर म्हणता आणि वृक्षकटाई, अस्वच्छता याची स्पर्धाच अधिक पाहायला मिळत असल्याची मार्मिक प्रतिक्रिया काही पर्यटकांनी बोलून दाखवली. कारण, दापोलीत येणारे प्रत्येक प्रवेशद्वारावर रस्तारूंदीकरणामुळे भकास झालेला परिसर पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोकण पाहायला आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होतो.
महाबळेश्वरचे सौंदर्य टिकून आहे. त्यामुळे तेथील पर्यटनामध्ये दिवसागणिक वाढच होत आहे. कारण, घनदाट झाडीमधून येत असलेला रस्ता हा खड्डेमुक्त आणि अतिशय सावलीने आणि गर्दझाडीने आच्छादलेला आहे. तेथे वर्षाचे ३६५ दिवस पर्यटन सुरू असते. असे असतानाही दापोली मात्र वृक्षतोडीच्या ग्रहणात अडकले आहे. महाबळेश्वरपेक्षा दापोलीचे पर्यटन दसपटीने अधिक आहे का? असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहेत. जर का अशीच वृक्षतोड सुरू राहिली तर दापोलीच्या वातावरण आणि निसर्गसौंदर्याची रया कायमची निघून जाईल आणि पर्यटक नंतर पाठ फिरवतील की, काय? अशी भीतीही व्यक्त होताना दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाचा विचार करता येथे येणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांच्या ऐवजी कोकणच्या साधनसंपत्तीवर आधारित प्रकल्पांना प्रोत्साहन देणे अत्यावश्यक असल्याची बाबही अधोरेखित होत आहे. मंडणगड येथे येणाऱ्या एमआयडीसीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी येथे कोकणाच्या साधनसंपत्तीवर आधारितच प्रकल्पांना मान्यता द्यावी. कोणतेही रासायनिक आणि विनाशकारी प्रकल्प आणू नयेत, असे मत व्यक्त केले आहे. याचा शासनाने, लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने विचार केला तर निश्चितच दापोलीचे सौंदर्य अधिक बहरेल!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

