पगारदार पतसंस्थांच्या समस्या सोडवा
14391
पगारदार पतसंस्थांच्या समस्या सोडवा
सिंधुदुर्ग शिक्षक पतपेढी; पतसंस्था फेडरेशनला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः राज्यभरातील पगारदार पतसंस्थांना काही समस्या भेडसावत असून, यावर राज्य सहकारी फेडरेशनने सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे यांची कोपरगाव (अहिल्यानगर) येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की सद्यस्थितीत पगारदार पतसंस्थांना सभासद कर्मचारी आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर कर्जफेड न करता जण्याची परवानगी शासनाने दिल्याने कर्ज थकीत होण्याचे, एन.पी.ए. होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पतसंस्थांना त्यांची चूक नसताना नाहक भुर्दंड पडत आहे. यापूर्वी कर्जधारक सभासद बदली झाल्यास संस्थेचा नाहरकत दाखला घेऊनच कार्यमुक्त केला जात असे. मात्र, आता केवळ कार्यमुक्त करताना कर्जदाराच्या ‘एलपीसी’वर कर्जाची नोंद करून सोडले जाते. यामुळे संबंधित कर्जदाराची ‘वसुली’ करताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे पगारदार पतसंस्थांची थकीत कर्जे वाढली आहेत. सद्यस्थितीत सहकार विभागाने दिलेली कर्जमर्यादा अपुरी असून, ही कर्जमर्यादा पगाराच्या ५० पट करण्याची मागणीही या निवेदनात केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरीतर्फे कोपरगाव (शिर्डी, जि. अहिल्यानगर) येथील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव येथे संस्थेचे संस्थापक चेअरमन व राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. कोयटे यांची भेट घेत निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली. यावेळी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष महेंद्र पावसकर, संचालक सर्वश्री संतोष मोरे, नारायण नाईक, विजय सावंत, दयानंद नाईक, संतोष राणे, श्रीकृष्ण कांबळी, मंगेश कांबळी, सीताराम लांबर, सचिन बेर्डे, किशोर कदम, मनोज सावळ, लिपिक लक्ष्मण कसाबले, गुरुप्रसाद दळवी उपस्थित होते.

