रत्नागिरीः रत्नदुर्ग किल्यावरिल शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण

रत्नागिरीः रत्नदुर्ग किल्यावरिल शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण

Published on

rat30p22.jpg
14409
रत्नागिरी ः शिवसृष्टीकडे जाणाऱ्या मार्गाची झालेली दुरवस्था.

शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण
रत्नदुर्ग किल्ल्या पर्यटकांची गैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनधारकांची कसरत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३०ः रत्नागिरीतील पर्यटनाला नवी झळाळी देण्यासाठी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या या प्रकल्पाने अल्पावधीतच राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित केले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक शिवसृष्टी पाहायला जात आहेत; मात्र पर्यटकांना रत्नागिरी शहर ते शिवसृष्टी या मार्गावरील खराब रस्त्याचे धक्के सहन करावे लागत आहेत.
रत्नागिरी शहरातून शिवसृष्टीकडे जाणाऱ्या मार्गावर सध्या प्रचंड खड्डे पडलेले असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. या मार्गावरून गाडी चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचा डांबर पूर्णपणे उखडून गेल्यामुळे केवळ खडी आणि माती उरलेली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढलेले आहेत. शिवसृष्टी पाहण्यासाठी येणारे पर्यटक मोठ्या उत्साहाने येतात; परंतु या मार्गावरील खड्ड्यांमुळे त्यांचा प्रवासाचा आनंद पूर्णपणे विरून जात आहे. अनेक पर्यटकांनी या दुरवस्थेबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला जात असताना साध्या रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न पर्यटक उपस्थित करत आहेत. याबाबत परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी सांगितले की, शिवसृष्टी हा प्रकल्प अतिशय देखणा आणि प्रेरणादायी आहे; परंतु तिथे पोहोचणारा रस्ता यातना देणारा आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहेच शिवाय वाहतूककोंडीचाही सामना करावा लागतो. हा प्रकल्प उभारण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे पर्यटकांचा ओघ रत्नदुर्ग किल्ला आणि शिवसृष्टी दोन्हीकडे वाढलेला आहे. या प्रकल्पाकडे जाणारा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

चौकट
खड्ड्यांचे ग्रहण
स्थानिक नागरिकांनीही किल्ल्याकडे जाणाऱ्या समस्येबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत; मात्र संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरूस्तीकडे पाठ फिरवली आहे. शिवसृष्टीच्या सौंदर्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले असून, पर्यटकांची वाढती नाराजी पाहता प्रशासनाने युद्धपातळीवर या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com