दापोली - उच्चांकी पर्यटकांमुळे दापोलीतील मासळीला उठाव
rat30p17.jpg-
14382
दापोली - येथील बाजारात विक्रीसाठी ठेवलेली कोळंबी.
rat30p18.jpg -
14383
पर्यटकांनी मासळी खरेदीसाठी लिलावामध्येही गर्दी केली होती.
उच्चांकी पर्यटकांमुळे दापोलीत मासळीला ''उठाव''
दिवसाला २ ते ३ लाखांची उलाढाल ; जानेवारीचा पहिला आठवडाही हाऊसफुल्ल
राधेश लिंगायत ः सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३० : मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीतील समुद्रकिनाऱ्यांवर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पर्यटकांचा राबता वाढलेला आहे. यंदा पर्यटकांनी उच्चांक गाठलेला आहे. त्यात नाताळ सुट्टी आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी दापोलीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रसिद्ध हर्णै बंदरात मासळी खरेदीसाठी पर्यटकांची झुंबड उडालेली आहे. ताजी मासळी खरेदीतून दररोज २ ते ३ लाखाची उलाढाल होत असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. यंदा सुरमई व पापलेटची आवक कमी झाल्यामुळे पर्यटक प्रामुख्याने कोळंबी खरेदीला प्राधान्य देत आहेत.
पर्यटन हंगामाच्या सुरवातीपासून दापोलीत येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. प्रत्येक सलग तीन आठवड्याच्या शनिवार, रविवारी पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. दापोलीत आल्हाददायक वातावरण असून, थंडीचा आनंद घेण्यासाठी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणेसह काही आंतरराष्ट्रीय पर्यटकही दापोलीत दाखल झाले आहेत. दाभोळ ते केळशीपर्यंतच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटनाच्या नकाशावर दापोली तालुक्याचे स्वतंत्र स्थान आहे. सध्या सुरू असलेल्या नाताळच्या सुट्टीत किनाऱ्यांवर पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी झालेली आहे. सध्या दापोली तालुक्याच्या सर्वच किनारपट्टीभागात तसेच समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल्स व रिसॉर्ट्समध्ये पर्यटकांची मोठी वर्दळ आहे. १५०० पासून ते ३ हजार रुपयांपर्यंत एका रूमसाठी पर्यटकांना मोजावे लागत आहेत. ३१ डिसेंबरला निरोप देण्यासाठी आणि नववर्ष स्वागतासाठी किनाऱ्यावरील निवासस्थाने हाऊसफुल्ल झालेली आहे.
दापोलीत आलेला पर्यटक हर्णै बंदराला भेट दिल्याशिवाय परत जात नाही, हे आता समीकरण झालेले आहे. ताजी मासळी खरेदी आणि कोकणी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक हजेरी लावत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांकडून ताजी मासळीची मागणी होत आहे. हर्णै बंदरात विविध प्रकारची मासळी मिळते. पापलेट, सुरमई, बांगडा व कोळंबी या माशांना पर्यटकांची विशेष पसंती असते; मात्र यंदा किनारी भागात वारे वाहत असल्यामुळे आणि थंडीचा कडाका वाढल्यामुळे पापलेट व सुरमईची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे टायनी कोळंबी, चालू कोळंबीसारख्या मासळीच्या खरेदीवर पर्यटकांचा भर आहे. काही पर्यटकांनी लिलावातून मासळी खरेदी केली आहे. हर्णैतील चिमणी बाजारात मासळी खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. डिसेंबरच्या सुरवातीपासून पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे हर्णै बंदरात दररोज २ ते ३ लाखांची उलाढाल होत आहे. महिन्याभरात सुमारे ५० लाखाहून अधिक उलाढाल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मासळी विक्रेत्यांच्या अच्छे दिन आले आहेत. दरम्यान, सुरमई, पापलेटची आवक कमी असल्याने अनेक पर्यटकांनी हॉटेलमध्ये पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी, झिंगा फ्राय, कोळंबी मसाला, कोळंबी करी यावर ताव मारला आहे. सध्या आवक कमी असल्याने पापलेट थाळीचे दर वधारलेले आहेत. थाळीला ५०० रुपये मोजावे लागत आहेत; परंतु, पापलेटची चव चाखण्यासाठी पर्यटकांचा खिसा रिकामा होत आहे.
--------------
कोट १
सध्या बंदरात ट्रॉलरपेक्षा नियमित मासे पकडून आणणाऱ्या नौकाचालकांना अधिक फायदा होत आहे. बंदरात पर्यटकांच्या आवडीची पापलेट, सुरमईची आवक खूप कमी आहे. वाजवी दर मिळणारी मासळी दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे कमी दरात मिळणाऱ्या मासळीमुळे ट्रॉलर नौकांचा खर्च सुटत नाही. ट्रॉलर नौका या ४ ते ८ दिवसांसाठी मासेमारीला जातात. त्यांना मिळकतीपेक्षा खर्चच अधिक करावा लागत आहे.
- नारायण रघुवीर, मच्छीमार, हर्णै
-------------------
कोट २
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हॉटेल रिसॉर्ट्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी बहुतांश रिसॉर्ट्स आरक्षित झाले होते. पर्यटक ताजी मासळी आणि कोकणी जेवणाचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे हर्णै बंदरातील मासळी आणि स्थानिक खाद्यसंस्कृती हा पर्यटनाचा मोठा आधारस्तंभ ठरलेला आहे. पुढील काही दिवस गर्दी राहील, असा अंदाज आहे.
- संदेश घाग, हॉटेल व्यावसायिक
----------------
चौकट
मासळीचे दर (किलोमध्ये, घाऊक )
* टायनी कोळंबी - १०५ रुपये
* चालू कोळंबी - ३०० रुपये
* पापलेट १००० रुपये
* सुरमई १२०० रुपये
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

