काव्यलेखन स्पर्धेसाठी सावंतवाडीत आवाहन
काव्यलेखन स्पर्धेसाठी
सावंतवाडीत आवाहन
सावंतवाडी ः आरती मासिक व चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्था सावंतवाडीत दरवर्षी निमंत्रितांच्या विभागीय कवयित्री संमेलनाचे आयोजन करते. यावर्षी हे संमेलन ३१ जानेवारीला होत असून यानिमित्त आरती मासिकाने सिंधुदुर्ग-गोवा मर्यादित नवोदित कवयित्री काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत १८ वर्षांवरील महिला सहभागी होऊ शकतील. पहिल्या तीन यशस्वी स्पर्धकांना निमंत्रितांसोबत संमेलनामध्ये आपली कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. यशस्वी कवितांना ‘आरती’ मासिकामधून प्रसिद्धी दिली जाईल. संमेलनात रोख रक्कम, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देऊन यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. इच्छुकांनी २० जानेवारीपर्यंत आपल्या फोन नंबरसह स्वरचित दोन कविता उषा परब, स्नेहांकुर, सर्वोदयनगर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग ४१६५१० या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन आरती मासिकातर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, प्रभाकर भागवत यांनी केले आहे.
......................
देवगड विषय समिती
सभापती निवड जाहीर
देवगड ः येथील नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड आज प्रभारी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत झाली. समिती सभापतिपदी भाजपच्या निवडी झाल्या आहेत. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांच्यासह अन्य नगरसेवक तसेच नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, नीलेश बांदिवडेकर, राजदीप कदम आदी उपस्थित होते. नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी पदसिध्द उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांची आणि उपसभापतिपदी मनिषा जामसंडेकर, तर सदस्यपदी मनिषा घाडी यांची निवड झाली. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतिपदी रोहन खेडकर यांची निवड झाली. या समितीमध्ये शरद ठुकरूल, स्वरा कावले सदस्य आहेत. स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी, सदस्यपदी प्रणाली माने, आद्या गुमास्ते, तर पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती सभापतिपदी तन्वी चांदोस्कर, सदस्य म्हणून संतोष तारी, रुचाली पाटकर यांचा समावेश आहे. नूतन सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
......................
कणकवलीत उद्या
रक्तदान शिबिर
कणकवली ः मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली उड्डाणपुलाखालील श्री देव महापुरुष ब्राह्मणदेव येथे यंदाही गुरुवारी (ता. १) सकाळी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली आणि श्री देव महापुरुष ब्राह्मणदेव मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ वाजता येथील हॉटेल सह्याद्री येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
......................
सांगेलीत रविवारी
रक्तदाता सन्मान
ओटवणे ः गेली दहा वर्षे रक्तदान उल्लेखनीय चळवळीत कार्य करणाऱ्या सांगेली येथील युवा विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त रविवारी (ता. ४) रक्तदान शिबिर व रक्तदाता सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. सांगेली केंद्रशाळेत सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. युवा विकास प्रतिष्ठान गेल्या १० वर्षांपासून रक्तदान चळवळीमध्ये सक्रिय असून सांगेली पंचक्रोशीसह परिसरातील अनेक गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करून त्यांना जीवदान देण्यात योगदान देत आहे.
.....................
विलवडेत विद्यार्थ्यांना
डिक्शनरीचे वितरण
ओटवणे ः बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेतर्फे विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयातील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त डिक्शनरीचे वितरण करण्यात आले. विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत डिक्शनरींचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सरपंच दळवी यांनी बँक ऑफ इंडियाच्या स्टार बॉडिंग उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना डिक्शनरीचे वितरण केल्याचे सांगून यासाठी बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखा व्यवस्थापक लक्ष्मण बोधवड यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. हायस्कूलचे मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, शिक्षक मुकुंद कांबळे, वनसिंग पाडवी व पालक उपस्थित होते. शिक्षक वनसिंग पाडवी यांनी बँक ऑफ इंडियाचे आभार मानले.
......................
कळसुली क्र. ३ शाळेत
शालेय साहित्य वाटप
कणकवली ः तालुक्यातील कळसुली येथील भोगनाथ विद्यामंदिर जिल्हा परिषद आदर्श शाळा, कळसुली क्र.३ येथील शालेय विद्यार्थ्यांना जीवन प्रबोधिनी ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी, त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम सूर्यकांत पालव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. यावेळी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट, मुंबईचे संस्थापक सत्यवान नर, ट्रस्टचे सदस्य संतोष हरपळे, कळसुली उपसरपंच सच्चिदानंद परब, माजी उपसरपंच गजानन मठकर, कळसुली इंग्लिश स्कूलचे व्हाईस चेअरमन नामदेव घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य दीक्षा तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण घाडीगावकर, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पालव, मुख्याध्यापक टोनी म्हापसेकर, अजिंक्य शेडगे, सहशिक्षिका अपेक्षा कदम, पोलिसपाटील शोभा घाडीगावकर, सुहास परब, समीर चव्हाण, वैष्णवी सावंत, युवराज आरोलकर, रामचंद्र सावंत आदी उपस्थित होते.
........................
मांडकुली मळावाडी
रस्त्याचे भूमिपूजन
कुडाळ ः मांडकुली मुख्य रस्ता ते भोईवाडी हायस्कूलमार्गे मळावाडी या रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणासाठी ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पाच लाख रुपये मंजूर केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व जमीन मालक विजय परब यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेली ठाकरे शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, पिंगुळी विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, उपविभागप्रमुख सचिन ठाकूर, सरपंच तुषार सामंत, धनवान खवणेकर, गोविंद अणसूरकर, चेतन सावंत, बाबी राऊळ, महादेव भोई, अमित तांबुळकर, उल्हास भोई, शशांक नार्वेकर, चैतन्य भोई, मानसी नार्वेकर, सुवर्णा माळगावकर, उषा भोई, सुनील पिंगुळकर, नामदेव भोई उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

