श्रीच्या परिवर्तनाच्या कथेची सुरुवात

श्रीच्या परिवर्तनाच्या कथेची सुरुवात

Published on

rat31p3.jpg-
O14627
डॉ. शरद प्रभूदेसाई

परिवर्तन...लोगो

इंट्रो

लहानपणापासून झालेल्या संस्कारांमुळे ‘श्री’ आस्तिक आहेच; पण त्याच्या नातलगांच्या प्रभावामुळे तो काही ग्रंथांचे वाचनही करतो. त्याचे लहानपण ईश्वरभक्तीत गेलेले असते. ‘चांगली बुद्धी’ देण्याचे साकडे तो ईश्वराला घालत असतो. त्याची ही ईश्वरभक्ती अगदी मनापासून चालू असते. वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत ! अचानक देवभक्तीपर ग्रंथांचे वाचन झाले, तेही नातलगांच्या प्रभावामुळेच ! पण त्या ग्रंथांतील विचार आणि आपले आचरण यात त्याला तफावत दिसली. किंबहुना, अशी तफावत ग्रंथ अभ्यासणाऱ्या सर्वच माणसांमध्ये त्याला आढळली. हे असे का, याचा तो विचार करता करता त्याचे परिवर्तन कसे झाले, याची ही कहाणी आहे. आगामी काळात हे बदल, त्यांची कारणे, त्यांचे परिणाम आणि अखेरीस या बदलांबाबतच्या चिंतनामुळे आपणही बदलावे, असे कहाणी वाचणाऱ्याला वाटू लागावे हीच ‘श्री’ची इच्छा.
- डॉ. शरद प्रभूदेसाई, रत्नागिरी


श्रीच्या परिवर्तनाच्या कथेची सुरुवात

नास्तिक किंवा आस्तिक असावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सदाचाराचे पालन करावे किंवा नाही, हा मला वाटते वैयक्तिक प्रश्न असू शकत नाही. प्रत्येकाने सदाचारी असावे हा मानवधर्म आहे आणि तो धर्मातीत आहे. पण सदाचरण म्हणजे नेमके काय, हे कसे कळावे? त्यासाठी आपण नेहमी संतसाहित्याचा आधार घेतो. ज्ञानेश्वरीत असे सांगितले आहे, तुकाराम असे म्हणतात, गीतेमध्ये असे आहे आणि सर्वांत शेवटी उपनिषदे व वेदांचा हवाला दिला जातो. या सर्व ग्रंथांत खरेच सदाचरणाबाबत उत्तम मार्गदर्शन आहे. असेच मार्गदर्शन बायबल आणि कुराणातही असणार !
या विविध ग्रंथांना धर्मग्रंथ असे म्हणतात. माणसाची धारणा कशी असावी, हेच या धर्मग्रंथांत विशद केले आहे. या विविध ग्रंथांचे आपापल्या परीने वाचन आणि अभ्यास धर्ममार्तंड करीत असतात. लोकांना भले काय, बुरे काय, याची माहिती देत असतात. त्यांचे वारंवार वाचन करण्याचा सल्ला दिला जातो. त्याला पारायण असे म्हणतात. असे केल्याने माणूस सुधारावा, अशी अपेक्षा असावी; पण असे केल्याने माणूस सुधारला का? दुर्दैवाने त्याचे उत्तर ‘नाही’ हेच मिळते. असे का व्हावे? एकतर माणसाला आपण ग्रंथांचे वाचन का करतो किंवा का करावे, हेच कळत नाही. त्यांनी केले म्हणून मी केले इतकेच. मग कोणी सांगतो, असे वाचन केल्याने पुण्य मिळते; कोणी म्हणतो, मनाला शांती मिळते; कोणी म्हणतो, आपल्याला यश मिळते; आणि सर्वांत शेवटी काय तर मरणानंतर स्वर्गवास मिळतो. काहींच्या मते, अशा वाचनाने आत्मविश्वास येतो, जो जीवनात अत्यंत महत्त्वाचा असतो. यात कोणाचे चूक किंवा बरोबर हे सांगणे योग्य नाही. ते समजण्यासाठी ही श्रीच्या परिवर्तनाची कथा आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीची नवरात्रे काही दिवसांवर येऊन ठेपली होती. घरात एकच लगबग चालू होती. घर झाडणे, भिंती सारवणे, जमीन सारवणे इत्यादी कामे करून घेण्यासाठी श्रीराम (श्री) च्या आईबाबांची गडबड चालली होती. श्री तसा लहान; त्यामुळे त्याच्याकडून कामे उरकण्यासाठी फारसा उपयोग नव्हता. पण छोटीछोटी कामे करण्यासाठी तो मदत करी. म्हणजे हाही कामात व्यस्त होता.
नवरात्र म्हणजे बाप्पाचा उत्सव! सर्वजण देवीचा उत्सव साजरा करण्यात मग्न; त्यामुळे हाही मग्न! सर्व तयारी हळूहळू पूर्ण होत आली आणि आश्विन शुद्ध प्रतिपदा उगवली. आज देव घट बसणार. वडील सकाळी लवकर उठून सर्व देवांना गरम पाण्याची आंघोळ घालत होते. सोवळ्या-ओवळ्याचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात होते. आणि ते योग्य प्रकारे पाळले जात आहेत की नाही, याकडे श्रीच्या आईचेही लक्ष होते. हे सर्व श्री लक्षपूर्वक पाहत होता. पण सोवळ्याच्या नियमामुळे श्रीला देव्हाऱ्याच्या जवळपासही जायला मिळत नसे. खरेतर श्रीला हे सर्व विधी अगदी जवळून पाहण्यात रस होता. श्री हे सर्व विधी लांबून म्हणजे ओटीवरून पाहत असे. श्री वडिलांना ‘बाबा’ म्हणत असे. बाबा कड नेसून देवाचे सर्व विधी करत. देवपूजा आणि जेवण झाल्यावर कड घडी करून देवघरात ठेवत.
या कडाला नेहमीच्या कपड्यांनी शिवलेले चाले. त्यामुळे सोवळेपणाला कोणतीही बाधा येत नसे. याचा अर्थ अंथरुणातील कपड्यांनी शिवलेले चालत नसत. या सर्व गोष्टी श्री हळूहळू आत्मसात करीत होता. अर्थात, हे सर्व त्याच्या हातून सहज होत होते. बाबाप्रमाणे आपण वागावे, त्यांचे थेट अनुकरण करावे, हेच त्याला लहान वयात कळत होते. मोठ्यांनी सांगितल्याप्रमाणे अनुसरले की मोठी माणसे खुश होतात, हेही श्रीच्या कुशाग्र बुद्धीने हेरले. त्यामुळे मोठ्यांचे अनुकरण करण्यात तोही टाळाटाळ करीत नसे. या सोवळ्या-ओवळ्या संबंधातील एक वेगळेच काम श्रीला करावे लागे. आई सोवळ्यांनी पापड, लोणची, मिरच्या आणि मसाले इत्यादी पदार्थ करी. ते सर्व पदार्थ वेगळ्या फडताळात ठेवत. या फडताळातून हे पदार्थ रात्री काढायचे झाल्यास सोवळे नेसूनच काढावे लागत. म्हणजे मोठ्यांना कड नेसणे भाग असे. हे मोठ्यांना त्रासदायक होत असे. त्यापेक्षा श्रीने हेच काम सर्व कपडे काढून केलेले चालत असे. सर्व कपडे काढून नागवा झालेला श्री हातपाय धुवून हे पदार्थ काढून देत असे. धसमुसळा श्री काही चुका करी; पण आई त्याच्याकडून योग्य प्रकारे काम करून घेत असे. सोवळे नेसून स्वतः सर्व करण्यापेक्षा हा मधला मार्ग निश्चीतच आईला योग्य वाटे. अशा प्रकारे सोवळ्या-ओवळ्याचे नियम श्रीच्या डोक्यात अगदी लहान वयातच बंदिस्त झाले.

(लेखक बालरोगतज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)

Marathi News Esakal
www.esakal.com