सकारात्मक दृष्टीकोनातून यश निश्चित
swt11.jpg
O14877
तळेरेः वामनराव महाडिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात पोलिस उपअधीक्षक विजय पांचाळ यांना मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
सकारात्मक दृष्टीकोनातून यश निश्चित
विजय पांचाळः तळेरे महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १ : बुद्धी हीच खरी संपत्ती आहे. शरीर, मन आणि बुद्धी यांचा मेळ घालत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. आई-वडिलांचा सन्मान ठेवा आणि चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष तथा पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गचे विजय पांचाळ यांनी केले. येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुकांत वरुणकर, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये, पंचक्रोशी विद्यामंदिर गवाणेचे अध्यक्ष अशोक तळेकर, माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, पत्रकार उदय दुधवडकर, वारगाव उपसरपंच नारायण शेटये, कणकवलीचे माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, तळेरे उपसरपंच संदीप घाडी, तळेरे पोलिसपाटील चंद्रकांत जाधव, प्राचार्य अविनाश मांजरेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण तसेच संस्थापक वामनराव महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. दीपप्रज्वलनानंतर ईशस्तवन, स्वागतगीत व संस्था गीत सादर करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय सहाय्यक शिक्षक सचिन शेटये यांनी करून दिला. दप्रशालेसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ए. पी. कोकरे व व्ही. डी. टाकळे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रास्ताविकात प्रा. मांजरेकर यांनी शाळेच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रातील चढता आलेख प्रभावी शब्दांत मांडला. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अशोक तळेकर व नागेश मोरये यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.

