

पर्यटकांची परतीच्या रेल्वेप्रवासात रखडपट्टी
विशेष गाड्यांच्या नादात नियमित बाजूला ; वेळापत्रक कोलमडले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्ष स्वागतासाठी कोकण आणि गोव्यात आलेल्या पर्यटकांची कोकण रेल्वेमार्गावर रखडपट्टी झाली. पनवेल येथील ब्लॉक तसेच उत्तर भारतातून आलेल्या विशेष गाड्यांमुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. मंगळवारी रात्री मुंबईत येणारी तेजस एक्स्प्रेस बुधवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचली. त्यामुळे परतीच्या प्रवासात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेष गाड्यांसाठी नियमित गाड्या बाजूला ठेवल्या गेल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई-ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक कोकण आणि गोव्याला येतात. किंबहुना, उत्तर भातातून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे नियमित गाड्यांबरोबर विशेष गाड्यांचा कोकण रेल्वेमार्गावर ताण येतो. अशातच मध्यरेल्वेने पनवेलजवळ घेतलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या त्रासात भर घातली. मंगळवारपाठोपाठ बुधवारी नियमित गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. मडगावहून सीएसएमटीला येणारी तेजस एक्स्प्रेस मंगळवारी रात्री १२.३० वा. पोहोचण्याऐवजी बुधवारी सकाळी ६.३० वा. दाखल झाली. त्यामुळे तिचा मडगावच्या दिशेने सुरू होणारा परतीचा प्रवास खोळंबला. नेहमी पहाटे ५.५० वाजता सीएसएमटीहून सुटणारी तेजस एक्स्प्रेस बुधवारी (ता. ३१) पाच तास उशिराने म्हणजेच ११ वाजता सुटली. याचा गोव्यात जाऊन ‘थर्टीफर्स्ट’ साजरा करण्याचा बेत आखलेल्या प्रवाशांना फटका बसला. गाडीची संपूर्ण प्रवासात रखडपट्टी होत गेली. ही गाडी चिपळूण स्थानकात सव्वासात तास उशिराने पोहोचली. इतर नियमित गाड्यांच्या वेळापत्रकावर विशेष गाड्यांचा परिणाम झाला.
-----
चौकट
तेजसऐवजी ‘वंदे भारत’ चालवा
कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने तेजस एक्सप्रेसच्या जागी वंदे भारत ट्रेन चालवावी जेणेकरून रेल्वेबोर्डाचे या गाडीकडे विशेष लक्ष राहील. तसेच रत्नागिरी, कुडाळसारख्या रेल्वेस्थानकांतील प्रवाशांना वंदे भारत गाडीचा पर्याय उपलब्ध होईल, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.