रामोशी आळीत टँकरची सुविधा
रामोशी आळीत
टँकरची व्यवस्था
चिपळूण : शहरातील रामोशी आळी परिसरात मचूळ पाणी येत असल्याची माहिती मिळताच चिपळूण नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक निहार कोवळे यांनी तातडीने दखल घेत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पाठवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चिपळूण नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कोयनेचे पाणी वशिष्ठीच्या पात्रात येत नाही त्यामुळे गोवळकोटमधील भरतीचे पाणी वाशिष्टी नदीला येते. हे पाणी मचूळ असते. नगरपालिका ते उचलते. त्यामुळे रामोशी आणि काही भागाला मचूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. येथे ग्रामस्थांनी या संदर्भात नगरसेवक कोवळे यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर कोवळे यांनी पालिकेच्यावतीने टँकर उपलब्ध करून नागरिकांना दिलासा दिला.
युनायटेडचा ‘रंगोत्सव’
उत्साहात साजरा
चिपळूण : शहरातील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात सुरू आहे. स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ‘रंगोत्सव’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कोकणातील पारंपरिक लोककला, लोकगीते आणि लोकसंस्कृतीची प्रभावी ओळख करून दिली. लोककलावंत व पत्रकार योगेश बांडागळे यांनी ‘कोकणचा साज – संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्यावर आधारित लोककलांची ओळख करून देणारा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष विजय चक्रदेव, संचालक अभय चितळे, मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षिका रेवती कारदगे आदी मान्यवर उपस्थित होते. सातवीतील चैतन्य जोगळे व त्याच्या सहकारी मित्रांनी संगीताची बाजू भक्कमपणे सांभाळली. नमन, जाकडी, भजन, लग्नाची गाणी अशा विविध कोकणी लोककला व लोकगीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोकणच्या समृद्ध संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.
लोकसेवा आयोगाची
पूर्वपरीक्षा ३ उपकेंद्रांवर
रत्नागिरी ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ ही परीक्षा रविवारी (ता. ४) रत्नागिरी तालुक्यातील ३ उपकेंद्रांवर एक सत्रात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी १ हजार १९० उमेदवार बसणार आहेत. परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १२ अशी आहे. या परीक्षेची बैठक व्यवस्था रत्नागिरी तालुक्यातील ३ उपकेंद्रांवर करण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. शिर्के प्रशाला उपकेंद्रावर RT००१००१ ते RT००१३३६, पटवर्धन हायस्कूल उपकेंद्रावर RT००२००१ ते RT००२३६०, फाटक हायस्कूल या उपकेंद्रावर RT००३००१ ते RT००३४९४ बैठक व्यवस्था केली आहे. परीक्षांमध्ये होणाऱ्या कॉपीचा किंवा गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. या परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्ती केलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

