वायंगणीत शिक्षक कपातीचा निषेध

वायंगणीत शिक्षक कपातीचा निषेध

Published on

वायंगणीतील मराठी शाळेत
शिक्षक कपातीचा निषेध
ग्रामसभेत ठराव ः आंदोलन छेडण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १ ः वायंगणी (ता. मालवण) गावातील मराठी माध्यमांच्या शाळांतील शिक्षक कपात धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गंभीर आघात होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामसभेत निषेध नोंदविला. ग्रामसभेत या धोरणाविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. शासनाने तत्काळ दखल न घेतल्यास वायंगणी ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व लाक्षणिक साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामसभेत देण्यात आला. याबाबतची माहिती वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांनी दिली.
श्री. पाटकर म्हणाले की, ग्रामसभेतील चर्चेदरम्यान भारताच्या संविधानातील कलम २१-A तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क असल्याचे अधोरेखित करण्यात आले. राज्य शासनामार्फत केवळ विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षक कपात करण्याचे धोरण राबविले जात असून, याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व मराठी माध्यमांच्या शाळांना बसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मालवण तालुक्यातील अनेक गावांची लोकसंख्या नैसर्गिकरित्या मर्यादित असल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी असणे हे प्रशासनिक अपयश नसून भौगोलिक व सामाजिक वास्तव असल्याचे ग्रामसभेने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत पटसंख्येचा एकमेव निकष लावून शिक्षक कपात केल्यास बहुवर्ग अध्यापन, शैक्षणिक गुणवत्तेतील घसरण, विद्यार्थ्यांवर अतिरिक्त शैक्षणिक ताण तसेच बालकांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर प्रत्यक्ष मर्यादा येत असल्याची गंभीर स्थिती निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले. शिक्षक कपात म्हणजे ग्रामीण व खेड्यांतील मुलांच्या शिक्षणावर थेट गदा आणण्याचा प्रकार आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामसभेत उमटली. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना धरून तसेच संविधान व आरटीई कायद्याच्या अनुषंगाने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांसाठी शिक्षक कपात धोरणाचा तत्काळ फेरविचार करावा, अशी मागणी ठरावाद्वारे शासनाकडे केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com