ओल्या काजूगरांसाठी नवे वाण
14973
14974
ओल्या काजूगरांसाठी नवे वाण
वेंगुर्लेत संशोधनः ‘वेंगुर्ला-१० एमबी’ नावाने शिफारस
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १ ः कोकणामधील ओल्या काजूगराची वाढती मागणी व ओल्या काजू बी मधून काजूगर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे सतत पंधरा वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण ‘वेंगुर्ला-१० एमबी’ या नावाने लागवडीसाठी शिफारस केले आहे. हे वाण चालू वर्षात प्रसारित झाल्यामुळे याची कलमे शेतकऱ्यांना पुढील वर्षापासून उपलब्ध होतील, अशी माहिती सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे यांनी दिली.
कोकणामध्ये ओल्या काजूगराला बाजारात प्रचंड मागणी असते. मोठमोठ्या शहरांतील हॉटेल्समध्ये भाजीसाठी, मटण व मच्छी करीमध्ये ओले काजूगराचा वापर केला जातो. ओले काजूगर सुक्या भाजीसाठी आणि पुलाव व बिर्याणीमध्ये देखील वापरले जातात. वेगवेगळ्या भाज्यांमधील रस्स्यामध्ये ओले काजूगर जेवणाची लज्जत वाढवितात. महिला हा रानमेवा मुबलक प्रमाणात विकायला घेऊन येतात. या ओल्या काजूगराला हंगामामध्ये बाजारात खूप मागणी असते. ओले काजूगर हंगामामध्ये ३०० ते ४०० रुपये शेकडा या दराने मिळतात. या काजूगराचा हंगाम जानेवारीपासून चालू होतो. काजूचे फळ तयार होण्यापूर्वी येणारी बी काढून त्यातील गर काढला जातो. ओले काजूगर काढण्यासाठी शेतकरी उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जातात. या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो व त्यांची साल जाड असल्यामुळे बियांमधून काजूगर काढणे फार अवघड असते. बऱ्याचदा गर काढताना जाड सालीमुळे अखंड गर न मिळता गराचा तुकडा होतो. तसेच बियांमध्ये असलेल्या अधिक चिकामुळे हात खराब होऊन हाताला इजा होते.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे नवीन वाण विकसित केले आहे. हे वाण निवड पध्दतीने विकसित केले असून या वाणामध्ये टरफलामधील कमी तेल, मध्यम टरफलाची जाडी व ओल्या काजू बी मधून गर काढण्यास सुलभ असल्यामुळे ओल्या काजूगरासाठी हे वाण उपयुक्त आहे.
या वाणाच्या काजू बीमधून ओले काजूगर काढण्यास सुलभ असल्यामुळे काजूगर काढण्यासाठी कमी वेळ खर्च होतो. त्यामुळे इतर वाणांच्या तुलनेत कमी वेळेत जास्त काजूगर मिळतात. पर्यायाने मजुरीमध्ये बचत होते. तसेच या वाणामध्ये काजू बी टरफलामधील तेल इतर वाणांच्या तुलनेत कमी प्रमाणात असल्यामुळे हाताला कमी इजा होते. ओल्या काजू बी मधील ओल्या काजूगराचे प्रमाण (३२ टक्के) जास्त असल्यामुळे एकूण ओल्या काजूगराचे प्रति झाड उत्पादन वाढते.
चौकट:
‘वेंगुर्ला-१० एमबी’ वाणाची वैशिष्टये
* ओल्या काजू बी मधून गर काढण्यास सुलभ
* मध्यम टरफलाची जाडी
* ओल्या काजू बी टरफलामधील कमी तेल (७.८७ टक्के)
* ओल्या काजूगरासाठी उपयुक्त
* ओल्या काजूगराचे अधिक प्रमाण
* ओल्या काजूगराचे अधिक उत्पादन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

