वस्तुस्थिती सिद्धतेसाठी पुरावा आवश्यक
swt24.jpg
15093
सावंतवाडीः येथील न्यायालयात व्याख्यानमालेत बोलताना अॅड. संदेश तायशेटे.
वस्तुस्थिती सिद्धतेसाठी पुरावा आवश्यक
अॅड. संदेश तायशेटेः सावंतवाडी दिवाणी न्यायालयात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः न्यायालयात एखादी घटना किंवा वस्तुस्थिती सिद्ध करताना प्राथमिक पुरावा सर्वश्रेष्ठ असतो; मात्र तो उपलब्ध नसल्यास कायद्यानुसार दुय्यम पुरावा सादर करण्याची योग्य पद्धत समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुडाळ येथील प्रसिद्ध दिवाणी वकील तथा माजी जिल्हा सरकारी वकील अॅड. संदेश तायशेटे यांनी केले.
सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने दिवाणी न्यायालय, सावंतवाडी येथे आयोजित ‘लेक्स डिस्कशन’ या व्याख्यानमालेतील चौथ्या पुष्पात ते बोलत होते. सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. बाळाजी बाबुराव रणशूर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ वकील अॅड. दिलीप नार्वेकर यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास अॅड. राघवेंद्र नार्वेकर, अॅड. परशुराम चव्हाण, अॅड. माधवी पेंडूरकर, अॅड. चुन्नीलाल आकेरकर, अॅड. सुप्रीम परब, अॅड. सुमित सुकी, अॅड. राहुल मडगावकर, अॅड. अभिजित चव्हाण, अॅड. पंकज आपटे, अॅड. सर्वेश कोठावळे, अॅड. राहुल गायकवाड, अॅड. प्रवीण काळसेकर, अॅड. किरण तोरसकर, अॅड. प्रतीक्षा भिसे, अॅड. वामन निर्गुण, अॅड. अनिल केसरकर, अॅड. अनिल निरवडेकर, दोडामार्गचे अॅड. प्रवीण नाईक उपस्थित होते.
अॅड. तायशेटे यांनी प्राथमिक पुरावा, दुय्यम पुरावा आणि दुय्यम पुरावा कसा सादर करावा या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय साक्ष अधिनियमातील तरतुदी, तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या महत्त्वपूर्ण निर्णयांच्या आधारे सविस्तर व सोप्या भाषेत सांगितले. प्राथमिक पुरावा म्हणजे काय, तो नसल्यास दुय्यम पुराव्याची आवश्यकता कधी निर्माण होते, तसेच दुय्यम पुरावा सादर करताना कोणत्या कायदेशीर बाबींचे पालन करणे गरजेचे आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यामुळे अनेकांना क्लिष्ट वाटणारा हा विषय उपस्थित वकील वर्गासाठी अधिक सुलभ व व्यवहार्य ठरला. अॅड. अलका कासकर यांनी आभार केले. या व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान उद्या (ता.३) दुपारी १२ वाजता येथील न्यायालयात आयोजित केले आहे. यामध्ये सहाय्यक धर्मादाय आयुक्त अवंतिका गजानन कुलकर्णी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व वकील बांधव तसेच विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. बाळाजी रणशूर यांनी केले.

